आईवडिलांच्या घटस्फोटावर पहिल्यांदाच व्यक्त झाली क्षिती जोग, म्हणाली, "मला आनंद झाला..."
By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2024 01:54 PM2024-04-29T13:54:29+5:302024-04-29T13:55:35+5:30
'ब्रोकन फॅमिली' मधून आल्याने क्षितीला कोणत्या गोष्टींचा सामना करावा लागला.
मराठी अभिनेत्री क्षिती जोग (Kshiti Jog) बऱ्याच वर्षांपासून मनोरंजनसृष्टीत काम करत आहे. पती हेमंत ढोमे आणि क्षिती या जोडीने गेल्या काही वर्षात अनेक हिट चित्रपट दिलेत. त्यात 'झिम्मा' आणि 'झिम्मा 2' सिनेमाने प्रेक्षकांचं मन जिंकून घेतलं आहे. तसंच क्षिती करण जोहरच्या 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' या सिनेमातही झळकली. क्षितीचे आईवडीलही दिग्गज मराठी कलाकार आहेत. अनंत जोग आणि उज्वला जोग यांची ती लेक आहे. मात्र क्षिती १८ वर्षांची असतानाच तिच्या आईवडिलांचा घटस्फोट झाला. यावर क्षितीने पहिल्यांदाच भावना व्यक्त केल्या आहेत.
क्षिती जोग 'आरपार' युट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत म्हणाली, "प्रामाणिकपणे सांगायचं तर मी १८ वर्षांची असताना जेव्हा त्यांचा घटस्फोट झाला तेव्हा मला फार आनंद झाला होता. कारण दोन माणसं जी एकमेकांबरोबर नुसती भांडत आहेत ज्यामुळे घराचं वातावरण बिघडतंय आणि ते दोघंही खूश नाहीयेत. मग एकत्र राहण्यात काही पॉइंट नाही कारण काही भांडणं ही सुटणारी नसतातच. ते दोघं भांडताएत त्यामुळे ते खूश नाहीयेत, मीही खूश नाहीये पण आम्ही जर वेगवेगळे राहिलो तर सगळे खूश आहेत. आता जेव्हा आम्ही तिघेही रोज भेटतो. बाबा आईकडे जेवायला जातात. दोघंही माझ्याकडे येतात. त्यामुळे आता आमचं छान कुटुंब आहे जे आपापले जगत आहेत."
ती पुढे म्हणाली, "मला तेव्हा अनेकांनी सहानुभूती दाखवली होती. पण मला ते नाही आवडायचं कारण जरी त्यांचा घटस्फोट झाला असला तरी मी जबाबदार मुलगी आहे आणि ते जबाबदार पालक आहेत. ते वेगळे झाले तरी मी कुठे आहे काय करतेय, मला उशीर होणार आहे का घरी पोहोचायला हे दोघांना माहित असायचं. तसंच मी आयुष्यात काही चुका केल्या तर याचं कारण मी त्यांच्यावर टाकत नाही. मला त्या गोष्टीचा बाऊ केलेला आवडत नाही."