'देवमाणूस' फेम अभिनेत्रीच्या भावाचं निधन, भावूक पोस्ट करत म्हणाली, 'मी थांबवू शकले असते...'
By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2023 11:27 AM2023-10-12T11:27:34+5:302023-10-12T11:32:54+5:30
१२ दिवसांनंतर तिने भावूक पोस्ट शेअर केली आहे.
'देवमाणूस' या मराठी मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री माधुरी पवारवर (Madhuri Pawar) दु:खाचा डोंगर कोसळला आहे. तिचा भाऊ अक्षयचं १२ दिवसांपूर्वी निधन झालं. भावाच्या निधनानंतर माधुरीला मोठा धक्का बसला आहे. १२ दिवसांनंतर तिने भावूक पोस्ट शेअर केली आहे. नियतीच्या मनात काय चालू असतं कोणीच सांगू शकत नाही असं म्हणत तिने भावना व्यक्त केल्या आहेत.
माधुरी लिहिते, "प्रिय अक्षय, तुला जाऊन १२ दिवस झाले...हे शब्दात व्यक्त करायची वेळ आली यासारखं दुर्दैव नाही...
नियतीच्या मनात नेमकं काय चालू आहे हे कुणी सांगू शकत नाही. उद्याचा दिवस कोणी पाहिलाय असं आपण बऱ्याचदा म्हणतो. खरंय उद्याचा दिवस पाहता आला असता तर मी माझ्या आयुष्यात माझ्या भावाच्या बाबतीत अचानकपणे घडलेली दुखःद घटना घडण्यापासून थांबवू शकले असते. तुझ्या असण्याची इतकी सवय झाली आहे ना की, तू नाहीयेस ही कल्पनाच सहन होत नाहीये. माझ्या आयुष्याच्या प्रत्येक वाटचालीत तुझी साथ होती, मग माझे इव्हेंट्स असो किंवा काही, तू माझ्याबरोबर असायचास, बऱ्याचवेळा माझ्या वतीने माझ्या अनुपस्थितीत आपलं घर सांभाळलंस, घरच्यांना सांभाळलंस, त्यांची काळजी घेतलीस. मला तुझा खूप आधार वाटायचा. स्वयंपाकाची आवड असल्यामुळे आपलं हॉटेल सुरू करायचं तुझं स्वप्न आपल्याला पूर्ण करायचं होतं ना. तू कोणालाही कधी 'नाही' असं बोलला नाहीस. लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांसाठी उभा राहिलास, कुठल्याही कामाला कमी लेखलं नाहीस, कुटुंबासाठी, मित्रांसाठी सदैव उभा राहिलास, आयुष्यात आलेल्या प्रत्येक व्यक्तीबरोबर तू आपलेपणाचं नातं तयार केलं होतंस. कुठल्याही स्त्रीचा अनादर केला नाहीस, स्वतःचं अस्तित्व निर्माण करण्यासाठी सतत झगडत राहिलास खरा पण कायम स्वतःपेक्षा बहिणींच्या कामाला प्राधान्य दिलंस, या तुझ्यातील सर्व गुणांचा मला अभिमान होता आणि कायम असेल.'
ती पुढे लिहिते,'तुझ्या हसऱ्या चेहऱ्यामुळे मला काम करण्यासाठी वेगळी उर्जा मिळायची. बहिणींच्या प्रेमापोटी तुला भाऊ म्हणून जे-जे करणं शक्य होतं ते तू केलंस. आई-बाबांचे संस्कार आणि आमच्या दोघांमधला समजूतदारपणा यामुळे आमच्यात कधी भांडणं झालीच नाहीत. तू माझा लाडका होतास आणि कायम राहशील. गेली अनेक वर्षे रक्षाबंधन आणि भाऊबीज आपण उत्साहात साजरी करायचो, यंदाचे रक्षाबंधनाचे तुझ्यासोबतचे क्षण आठवत आहेत, पण येत्या दिवाळीतील भाऊबीज आठवून जास्त त्रास होतोय... एका सावलीसारखा माझ्या सोबत असायच, पुढच्या प्रवासात तुझ्याशिवाय जगायची सवय कशी करून घेऊ?" माझा नेहमी अट्टहास असायचा की अक्षय तुला जे काही पाहिजे ते जगाकडे मागण्याऐवजी माझ्याकडे माग. आजही तुला खूप काही द्यावंसं वाटतंय, तुझ्या इच्छा पूर्ण कराव्याश्या वाटत आहेत आणि मी ते नक्की करेन.'
'मी नक्कीच गेल्या जन्मी पुण्य केलं असणार म्हणून मी या जन्मी मला तुझ्यासारखा भाऊ मिळाला पण तुझ्यासोबत आयुष्य अजून जास्त जगायला नक्कीच आनंद झाला असता...जिथे कुठे असशील तिथे देखील सगळ्यांना हसत खेळत ठेवशील याची मला खात्री आहे. माझ्या करिअरमध्ये तुझा सर्वात जास्त मोलाचा वाटा होता, मला एका मोठ्या उंचीवर तुला पाहायचं होतं, तुझी ही इच्छा पूर्ण करण्यासाठी मी नक्की अजून मेहनत घेईन आणि कामाची जोमाने सुरुवात करेन. तुझी साथ, तुझं प्रेम, तुझा पाठिंबा माझ्या पाठीशी तसाच कायम ठेव! पण तुझी उणीव माझ्या मनात आणि आयुष्यात कायम राहणार अक्षू..'
माधुरीची ही पोस्ट खूपत भावूक करणारी आहे. तिच्या पोस्टवर सर्वांनी कमेंट करत श्रद्धांजली अर्पण केली आहे. तसंच माधुरीला धीर दिला आहे. माधुरी अभिनेत्री आणि नृत्यांगना आहे. 'देवमाणूस', 'तुझ्यात जीव रंगला' मालिकांमध्ये काम केलं आहे. 'अप्सरा आली' या डान्स शोची ती विजेती राहिली आहे. शिवाय तिने 'लंडन मिसळ' या मराठी सिनेमात भूमिका साकारली आहे.