'या' मराठमोळ्या अभिनेत्रीने दिला गोंडस मुलाला जन्म, वयाच्या ३३ व्या वर्षी झाली आई; शेअर केली पोस्ट
By ऋचा वझे | Updated: March 12, 2025 12:39 IST2025-03-12T12:37:29+5:302025-03-12T12:39:29+5:30
लग्नानंतर दीड वर्षात तिने पहिल्या बाळाला जन्म दिला आहे.

'या' मराठमोळ्या अभिनेत्रीने दिला गोंडस मुलाला जन्म, वयाच्या ३३ व्या वर्षी झाली आई; शेअर केली पोस्ट
मराठी कलाविश्वात गेल्या काही वर्षात अनेक अभिनेत्रींनी गुडन्यूज दिली आहे. काही दिवसांपूर्वीच 'मन उधाण वाऱ्याचे' फेम अभिनेत्रीने ऑस्ट्रेलियात मुलाला जन्म दिला. त्याचं नाव 'इवान' असं ठेवण्यात आलं. आता आणखी एका मराठी अभिनेत्रीला मुलगा झाला आहे. कालच तिने गोंडस मुलाला जन्म दिला असून सोशल मीडियावर पोस्ट करत तिने चाहत्यांना ही आनंदाची बातमी दिली आहे. कोण आहे ती अभिनेत्री?
मराठमोळी अभिनेत्री मानसी मोघेने (Manasi Moghe) काल गोंडस मुलाला जन्म दिला. वयाच्या ३३ व्या वर्षी ती आई झाली आहे. मानसीचा नवरा सूर्या शर्माने सोशल मीडियावर फोटो शेअर करत ही गुडन्यूज दिली. तो लिहितो, "आज हृदय प्रेमाने भरुन आलं आहे. तुमच्या सर्वांच्या प्रेम आणि प्रार्थनेसाठी खूप खूप आभार. आमच्या मुलाची या जगाशी ओळख करुन देण्यासाठी मी उत्सुक आहे."
काही दिवसांपूर्वीच मानसीने तिचं प्रेग्नंसी शूट पोस्ट केलं होतं. यात तिच्या चेहऱ्यावर कमालीचा ग्लो होता. तर काल ११ मार्च रोजी मानसीला मुलगा झाला. त्यामुळे दोन्ही कुटुंबियांतील सदस्यांचा आनंद गगनात मावेनासा झालाय. मानसी आणि सूर्या ९ डिसेंबर २०२३ रोजी लग्नबंधनात अडतले. लग्नानंतर दीड वर्षांनी ते आता आईबाब झाले आहेत. त्यांच्या आयुष्याचा पुढचा टप्पा सुरु झाला आहे.
वर्कफ्रंट
अभिनेत्री मानसी मोघेने २०१५ साली 'बुगडी माझी सांडली गं'मधून मराठी सिनेइंडस्ट्रीत पदार्पण केले. तिने 'ख्वाबों के परिंदे' या वेबसीरिजमध्ये काम केले आहे. तर सूर्या शर्मादेखील अभिनेता आहे. त्याने बऱ्याच वेबसीरिजमध्ये काम केले आहे. 'अनदेखी', 'ये काली काली आँखे', 'हॉस्टेजेस' आणि 'ब्राउन' या सीरिजचा समावेश आहे.