Y movie Review: नारीची शत्रू अन् मित्रही नारीच!; वाचा कसा आहे सिनेमा आणि तिकीट बुक करा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2022 02:47 PM2022-06-24T14:47:36+5:302022-06-24T14:47:43+5:30

Y movie Review: स्त्रीभ्रूणहत्या ही अनादीकालापासून भारतीय समाजाला भेडसावणारी समस्या आहे. बरेच कायदे करूनही अद्याप अशा प्रकारांना आळा बसलेला नाही हे कटू सत्य आहे. पण नारीच जेव्हा नारी जन्माची शत्रू बनते तेव्हा कितीही कायदे केले तरी काही उपयोग नाही.

marathi actress mukta barve Y movie Review | Y movie Review: नारीची शत्रू अन् मित्रही नारीच!; वाचा कसा आहे सिनेमा आणि तिकीट बुक करा

Y movie Review: नारीची शत्रू अन् मित्रही नारीच!; वाचा कसा आहे सिनेमा आणि तिकीट बुक करा

googlenewsNext

संजय घावरे

मराठी चित्रपट परीक्षण : Y movie
दर्जा : तीन स्टार 
कलाकार : मुक्ता बर्वे, नंदू माधव, प्राजक्ता माळी, ओमकार गोवर्धन, रोहित कोकाटे, सुहास शिरसाट, संदीप पाठक, काव्या पाठक, प्रदीप भोसले
लेखक-दिग्दर्शक : अजित वाडीकर
निर्माते : कल्टइन प्रोडक्शन प्रा. लि.
शैली : ड्रामा थ्रिलर
कालावधी : २ तास २ मिनिटे

स्त्रीभ्रूणहत्या ही अनादीकालापासून भारतीय समाजाला भेडसावणारी समस्या आहे. बरेच कायदे करूनही अद्याप अशा प्रकारांना आळा बसलेला नाही हे कटू सत्य आहे. याला जबाबदार कोण? या प्रश्नाचं उत्तर शोधायचं तर समाजातील इतर सर्व घटकांचे चेहरे समोर येतातच, पण नारीच जेव्हा नारी जन्माची शत्रू बनते तेव्हा कितीही कायदे केले तरी काही उपयोग नाही. देवस्वरूप मानले जाणारे डॉक्टर्सच जेव्हा राक्षसी मनोवृत्तीचे बनतात आणि केवळ पैशांसाठी पोलीस यंत्रणाही त्यांच्या दिमतीला उभी ठाकते तेव्हा अशा प्रकारांना आळा घालणं अशक्यप्राय बनतं. यापूर्वीही बऱ्याचदा समोर आलेल्या स्त्रीभ्रूणहत्या या विषयावर लेखक-दिग्दर्शक अजित वाडीकर यांनी हा चित्रपट बनवला आहे.

चित्रपटाची कथा डॉ. आरती देशमुख या वैद्यकीय अधिकाऱ्याभोवती फिरते. एका मुलीची आई असलेल्या आरतीकडे स्त्रीभ्रूणहत्येमध्ये सहभागी असणाऱ्या वैद्यकीय यंत्रणांची तपासणी करण्याचं काम असतं. आपलं काम चोख बजावणाऱ्या कर्तव्यदक्ष आरतीसमोर डॉ. पुरुषोत्तम आव्हान बनून उभा रहातो. बऱ्याचदा प्रयत्न करूनही पुरुषोत्तमविरोधात आरतीच्या हाती कोणताही पुरावा लागत नाही. अखेर पुरुषोत्तम आपल्या पॉवरचा वापर करून आरतीची बदली घडवून आणतो, पण बदलीपूर्वी उरलेल्या दिवसांमध्ये आरती पुरावे गोळा करण्याचं काम हाती घेते. या कामी ती यशस्वी होते का? पुरुषोत्तमला अद्दल घडवण्यात ती यशस्वी होते का? या प्रश्नांची उत्तरं चित्रपटात आहेत.

लेखन-दिग्दर्शन : चित्रपटाचा विषय नवीन नसला तरी पटकथेची मांडणी काहीशा वेगळ्या प्रकारे करण्यात आली आहे. विशेषत: मध्यंतरापूर्वीच्या भागात विविध घटनांच्या एकमेकांमध्ये गुंफून सादर करण्यात आल्या आहेत. 

चित्रपटातील काही संवाद हृदयाला भिडणारे आहेत. काही ठिकाणी पार्श्वसंगीत नसलेली निरव शांतताही बरंच काही सांगते. या पुरुष प्रधान संस्कृतीत स्त्री कुठेही सुरक्षित नाही... ना घरी, ना बाहेर, ना गर्भात... यांसारखे संवाद भावुक करतात. या चित्रपटातील वाय म्हणजे 'येस' नसून 'का' हा प्रश्न विचारणारा आहे. हे सर्व प्रत्येकानं आपापल्या परीनं थांबवायला हवं असं सांगणारा हा चित्रपट आहे. समाजानं जरी कितीही दबाव टाकला तरी जन्म देणारीनंतर तिचा जन्म नाकारू नये असं सांगणारी आहे. काही ठिकाणी गती मंदावल्यानं आणि लांबी थोडीशी लांबल्यासारखी वाटते. शेवट अधांतरी ठेवण्यात आला आहे. कॅमेरा चांगल्याप्रकारे हाताळण्यात आला आहे. आरती आणि तिच्या मुलीचं नातं उलगडणारे क्षण खूप छान सादर केले आहेत. ऑपरेशन थिएटरमधील काही क्षण आणि आवाज मन विचलित करू शकतात.

अभिनय : मुक्ता बर्वेनं पुन्हा एकदा जबरदस्त अभिनय केला आहे. कर्तव्यदक्ष अधिकारी आणि माता ही दोन्ही रूपं तिनं अतिशय सुरेखपणे सादर केली आहेत. नंदू माधव यांनी कुठेही अतिरंजीतपणा न करता अतिशय शांत आणि संयतपणे खलनायकी डॉक्टर साकारला आहे. ही व्यक्तिरेखा नंदू यांच्या आजवरच्या भूमिकांपेक्षा खूपच वेगळी आहे. ओमकार गोवर्धनची मुक्ताला उत्तम साथ लाभली आहे. सुहास शिरसाटनं रंगवलेला मुन्नाही बॅलन्स वाटतो. संदीप पाठक आणि प्राजक्ता माळी यांनीही महत्त्वपूर्ण भूमिकांमध्ये छान काम केलं आहे. याशिवाय रोहित कोकाटे, काव्या पाठक, प्रदीप भोसले यांची कामंही चांगली झाली आहेत.

सकारात्मक बाजू : समाजातील ज्वलंत विषय चित्रपटाद्वारे सर्वदूर पोहोचवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. कुठेही मनोरंजक मसाल्यांचा वापर न करता वास्तवदर्शी चित्र दाखवण्यात आलं आहे.

नकारात्मक बाजू : यापूर्वीही हा मुद्दा बऱ्याचदा हाताळण्यात आला आहे. काही ठिकाणी गती मंद झाल्यासारखी वाटते. मसालेपटांच्या चाहत्यांना हे वास्तव पहायला कदाचित आवडणार नाही.

थोडक्यात : या चित्रपटातील निर्दयी व्यक्तीही जीवंत मुलीला मारण्याचं पाप करत नाही, पण जन्मदाते आणि देवसमान डॉक्टरच जेव्हा यमरूप धारण करतात तेव्हा सर्वच संपतं. हे असं का? याला जबाबदार कोण? असे प्रश्न विचारणारा हा चित्रपट एकदा पहायला हरकत नाही.

All that you would like to explore and know about the movie Y (Marathi) -

https://in.bookmyshow.com/pune/movies/y-marathi-marathi/ET00330039 @Bookmyshow


 

Web Title: marathi actress mukta barve Y movie Review

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.