"वाड्यात साप, विंचू खाली पडायचे", 'पछाडलेला' फेम अभिनेत्रीने सांगितला शूटिंगचा भयानक अनुभव, म्हणाली...
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2024 15:15 IST2024-12-06T15:15:08+5:302024-12-06T15:15:42+5:30
'पछाडलेला' सिनेमात नीलम शिर्केने सुनयना ही लक्ष्याच्या बहिणीची भूमिका साकारली होती. नुकतंच तिने 'लोकमत फिल्मी'च्या 'नो फिल्टर' या खास शोमध्ये हजेरी लावली होती.

"वाड्यात साप, विंचू खाली पडायचे", 'पछाडलेला' फेम अभिनेत्रीने सांगितला शूटिंगचा भयानक अनुभव, म्हणाली...
मराठीतील एव्हरग्रीन सिनेमांपैकी एक म्हणजे 'पछाडलेला'. २००४ साली प्रदर्शित झालेल्या या हॉरर सिनेमाने प्रेक्षकांची घाबरगुंडी उडाली होती. महेश कोठारेंचं दिग्दर्शन असलेल्या या सिनेमात भरत जाधव, श्रेयस तळपदे, अभिराम भडकमकर, दिलीप प्रभावळकर, वंदना गुप्ते, मेघा घाडगे, अश्विनी कुलकर्णी, नीलम शिर्के, लक्ष्मीकांत बेर्डे अशी स्टारकास्ट होती. या सिनेमात नीलम शिर्केने सुनयना ही लक्ष्याच्या बहिणीची भूमिका साकारली होती. नुकतंच तिने 'लोकमत फिल्मी'च्या 'नो फिल्टर' या खास शोमध्ये हजेरी लावली होती.
'लोकमत फिल्मी'ला दिलेल्या मुलाखतीत नीलम शिर्केने 'पछाडलेला' सिनेमाच्या शूटिंगचा अनुभव सांगत काही किस्से शेअर केले. ती म्हणाली, "पछाडलेला हा माझा पहिला सिनेमा होता. महेश कोठारे सर दिग्दर्शन करणार होते. त्यांच्याबरोबर काम करायला मिळतेय, म्हणून खूश होते. मोठ्या कलाकारांबरोबर काम करायला मिळणार होतं. शूटिंगसाठी दीड महिना गगनबावड्याला जाऊन राहायचं होतं. प्रत्येकाला राहण्यासाठी जागा दिल्या होत्या. सगळ्या लेडी आर्टिस्टला छोटं गेस्टहाऊस दिलं होतं. ज्यात तीन रुम्स होत्या. त्यापासून लांब ७ किमी अंतरावर पुरुष कलाकारांच्या राहण्याची व्यवस्था केली होती. तिथून १० किमीवर टेक्निकल टीम होती. तिथे फक्त सकाळी एक आणि संध्याकाळी ५.३० वाजता एक अशा दोनच एसटी बस जायच्या. काळोख असायचा त्यामुळे आम्ही रुमच्या बाहेरही पडायचो नाही. संध्याकाळी ६ वाजता आम्हाला घ्यायला गाडी यायची आणि संपूर्ण रात्रभर आम्ही शूट करायचो. तो पडका वाडा २२ किमी अंतरावर होता".
"त्या वाड्यात लाईट, पंखा काहीही नव्हतं. एकदा मी माझ्या हेअरड्रेसरला घेऊन कपडे बदलण्यासाठी एका रुममध्ये गेले. तिने सहज सगळीकडे टॉर्च मारुन रुममध्ये बघितलं. त्या रुममध्ये मोठमोठ्या कपाटांमध्ये वाळवी लागलेली पुस्तकं होती. जिथे काच फुटली होती त्यातून आम्ही एक पुस्तक काढलं. त्यात भूतकाळ-भविष्य असं लिहिलेलं बघितलं आणि आम्ही तिथून जो पळ काढला...त्या संपूर्ण वाड्यात जिथून कुठून केबल टाकली जायची तिथून सापाचं पिल्लू पडायचं. विंचू पडायचा...इतकं भयानक आणि भूतासारखं होतं. आमच्या स्पॉटदादाने एकदा एका माकडाची खोड काढली होती. दुसऱ्य दिवशी तो ७-८ माकडं घेऊन आला होता. त्याने आमचं शूटिंग बंद पाडलं. लाईटच खेचून घेऊन गेला", असंही नीलम पुढे म्हणाली.