"स्ट्रेचरवर झोपलेली मुलगी नाटक बघायला आली अन्...", निर्मिती सावंत यांनी सांगितला चाहतीचा 'तो' प्रसंग
By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2024 12:41 PM2024-07-18T12:41:01+5:302024-07-18T12:41:52+5:30
लोकमत फिल्मीला दिलेल्या मुलाखतीत निर्मिती सावंत यांनी फिल्मी करिअर, वैयक्तिक आयुष्य याबाबत भाष्य केलं. यावेळी एका नाटकाच्या प्रयोगादरम्यानचा चाहतीचा किस्साही निर्मिती सावंत यांनी शेअर केला.
'गंगूबाई नॉनमॅट्रिक'मधून घराघरात आणि प्रेक्षकांच्या मनामनात स्थान मिळवलेली अभिनेत्री म्हणजे निर्मिती सावंत. सडपातळ आणि नाजूक बांधा असलेली या अभिनेत्रीच्या इमेजला छेद देत निर्मिती सावंत यांनी सिनेसृष्टीत त्यांची ओळख निर्माण केली. अनेक नाटक, मालिका आणि सिनेमांमध्ये काम केलेल्या निर्मिती सावंत या मराठी कलाविश्वातील कॉमेडी क्वीन आहेत. नुकतीच त्यांनी लोकमत फिल्मीच्या नो फिल्टर शोमध्ये हजेरी लावली होती.
लोकमत फिल्मीला दिलेल्या मुलाखतीत निर्मिती सावंत यांनी फिल्मी करिअर, वैयक्तिक आयुष्य याबाबत भाष्य केलं. यावेळी एका नाटकाच्या प्रयोगादरम्यानचा चाहतीचा किस्साही निर्मिती सावंत यांनी शेअर केला. 'श्यामची मम्मी' नाटकाचा किस्सा सांगताना त्या म्हणाल्या, "तेव्हा नवीन थिएटरचं उद्घाटन होतं. आमचा श्यामची मम्मी या नाटकाचा प्रयोग होता. नवीन थिएटरचं उद्घाटन असल्यामुळे तिथे खूप गडबड होती. मी प्रयोगाआधी सगळं चेक करते आणि स्टेजवर असते. ते सगळं करत असतानाच बॅकस्टेजचा एक मुलगा येऊन मला म्हणाला की काहीतरी सांगायचं आहे. मी त्याला म्हटलं की आता मी नाटकाच्या मूडमध्ये चाललीये. तर आता सांगू नको".
"श्यामची मम्मी नाटकात माझी एन्ट्री ही सुरुवातीलाच असायची. मी एन्ट्री घेतली, नमस्कार करून समोर बघितलं आणि मी ब्लँक झाले. कारण, समोर एक मुलगी स्ट्रेचरवर झोपलेली होती. मी कसा तरी तो सीन करून बॅकस्टेजला गेले. त्यांना विचारलं की तुम्ही आधी मला सांगितलं का नाही? तेव्हा तो मुलगा म्हणाला की मी सांगायला आलो होतो. पण, तुम्ही तेव्हा सांगू दिलं नाही. ती मुलगी तुमची चाहती आहे. गंगूबाई या मालिकेची ती चाहती आहे. तिला दुर्धर आजार आहे. पण, फक्त तुम्हाला बघायचं म्हणून ती इथे आली आहे. याच्यापेक्षा एका कलाकाराला अजून काय हवं? हे मी विसरू शकत नाही. एक मुलगी तिच्या जीवन मरणाचा प्रश्न असताना केवळ मला बघण्यासाठी आली, याच्यापेक्षा अजून काय हवं?", असंही त्यांनी पुढे सांगितलं.
सध्या निर्मिती सावंत 'आजीबाई जोरात' या नाटकात काम करत आहेत. निर्मिती सावंत यांची 'गंगूबाई नॉनमॅट्रिक' ही मालिका प्रचंड गाजली. त्यांनी तू तू मै मै, जाडूबाई जोरात या मालिकांमध्येही काम केलं आहे. 'खबरदार', 'नऊ महिनी नऊ दिवस', 'शुभमंगल सावधान', 'आयडियाची कल्पना', 'निशाणी डावा अंगठा', 'आम्ही सातपुते', 'महाराष्ट्र शाहीर' या सिनेमांत त्या दिसल्या. 'झिम्मा' आणि 'झिम्मा २' या सिनेमांमधील त्यांच्या भूमिका विशेष गाजल्या.