तिच्याशिवाय माझं आयुष्य...; आईच्या आठवणीत भावुक झाल्या निवेदिता सराफ
By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2022 04:52 PM2022-05-19T16:52:47+5:302022-05-19T16:55:15+5:30
Nivedita Saraf Post : सध्या निवेदिता यांची एक भावुक पोस्ट व्हायरल होतेय. आईच्या आठवणीत त्यांनी एक भावुक पोस्ट शेअर केली आहे.
अभिनेत्री निवेदिता सराफ (Nivedita Saraf ) चित्रपट, टीव्हीसोबतच सोशल मीडियावरही तितक्याच अॅक्टिव्ह आहेत. सध्या निवेदिता यांची एक भावुक पोस्ट व्हायरल होतेय. आईच्या आठवणीत त्यांनी एक भावुक पोस्ट शेअर केली आहे.
आईसोबतचा एक सुंदर फोटो निवेदिता यांनी शेअर केला आहे. ‘आज आईला जाऊन ७ वर्ष झाली तिच्याशिवायच माझं आयुष्य कधी imagine केलच् नव्हतं माझी गुरु, मैत्रीण आणि सर्व काही..., असं आईसोबतचा फोटो शेअर करताना निवेदिता यांनी लिहिलं आहे.
निवेदिता यांच्या आई विमल गजानन जोशी यांचं 2015 मध्ये निधन झालं. विमल गजानन जोशी या आकाशवाणीवर 35 वर्षे कार्यरत होत्या. मराठी रंगभूमीवर कस्तुरीमृग, जास्वंदी, नटसम्राट, चाकरमानी अशा नाटकांमधून त्यांनी काम केलं होतं. हिंदीतही इप्टा थिएटरमधील नाटकांमधून त्यांनी काम केलं होतं. बलराज सहानी आणि संजीव कुमार अशा दिग्गज कलावंतांबरोबर त्यांनी हिंदी नाटकांमध्ये भूमिका साकारल्या होत्या.
निवेदिता यांच्या वडिलांनीही 70 च्या दशकातील दैवाचा खेळ, आधार, सौभाग्यकांक्षीनी अशा अनेक चित्रपटात काम केलं होतं. निवेदिता जोशी यांच्या बहिणीने डॉक्टरेट केली असली तरी त्यांनी अभिनयाचा छंद देखील जोपासला आहे. डॉ मीनल परांजपे असं त्यांच्या बहिणीचं नाव असून अरण्यक या नाटकात त्यांनी कुंतीची भूमिका साकारली होती. तसेच ध्यासपर्व या चित्रपटात देखील त्या एका महत्त्वाच्या भूमिकेत दिसल्या होत्या.
निवेदिता यांच्याबद्दल सगळ्यांना ठाऊक आहे. निवेदिता सराफ या उत्तम अभिनेत्री आहेतच शिवाय तितक्याच उत्तम सुगरण देखील आहेत. निवेदिता या काही रेसिपीज सोशल मीडियावर शेअरदेखील करतात. निवेदिता सराफ रेसिपीज नावाचं त्यांचं स्वत:चं युट्यूब चॅनेल आहे.