Prajakta Mali : "इथून पुढील सर्वच वर्ष..."; प्राजक्ता माळीने राज ठाकरेंना दिल्या वाढदिवसाच्या आभाळभर शुभेच्छा
By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2023 12:09 PM2023-06-14T12:09:16+5:302023-06-14T12:26:30+5:30
Prajakta Mali And Raj Thackeray : अभिनेत्री प्राजक्ता माळीनेही राज ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा आज वाढदिवस आहे. त्यांच्या वाढदिवशी राज्यभरातून कार्यकर्ते त्यांना शुभेच्छा देण्यासाठी येत असतात. आजही त्यांच्या निवासस्थानाबाहेर प्रचंड गर्दी झाली आहे. प्रत्येकाला भेटता यावं याकरता राज ठाकरेंनी देखील खास वेळ बाजुला काढून ठेवला आहे. पक्षाचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने शिवतीर्थावर भेटण्यासाठी आले आहेत. याच दरम्यान अभिनेत्री प्राजक्ता माळीनेही राज ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
प्राजक्ताने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून राज ठाकरे यांना पुष्पगुच्छ देतानाचे दोन फोटो शेअर केले आहेत. तसेच "महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष, मा. श्री. राजसाहेबांना वाढदिवसाच्या आभाळभर शुभेच्छा.. इथून पुढील सर्वच वर्ष, खासकरून हे वर्ष आपल्या आयुष्यातील सर्वोत्कृष्ट वर्ष ठरो…" असं म्हटलं आहे. प्राजक्ता माळीच्या या पोस्टची सध्या सर्वत्र जोरदार चर्चा रंगली आहे.
राज ठाकरेंनी यंदाच्या वाढदिवसानिमित्त नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना महत्वाचं आवाहन केलं आहे. फेसबुक पोस्ट लिहित राज ठाकरे म्हणाले की, दर वर्षी १४ जूनला माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून महाराष्ट्र सैनिक मोठ्या संख्येने मला भेटायला, शुभेच्छा द्यायला येतात. त्यावेळी तुमची होणारी भेट, तुमच्याकडून मिळणाऱ्या शुभेच्छा हीच माझ्यासाठी तुमच्याकडून मिळणारी मोठी भेट असते, असं राज ठाकरेंनी म्हटलं आहे.
राज ठाकरे पुढे म्हणाले की, महाराष्ट्र सैनिक येताना पुष्पगुच्छ, मिठाई आणि भेटवस्तू घेऊन येतात. पण ह्यावर्षीपासून माझी तुम्हाला मनापासून विनंती आहे की,कृपया पुष्पगुच्छ, मिठाई अथवा कोणतीही भेटवस्तू आणू नका. तुम्हाला अगदीच काही आणावंसं वाटत असेल तर येताना झाडाचं रोप किंवा शैक्षणिक साहित्य मग त्या वह्या असतील किंवा तसंच एखादं छोटंसं शैक्षणिक साहित्य आणा. तुम्ही दिलेली झाडांची रोपं आपण विविध संस्थांना वृक्षारोपणासाठी देऊ. आणि जे काही शैक्षणिक साहित्य भेटवस्तू म्हणून आणाल ते गरजू विद्यार्थ्यांना आपल्या पक्षाकडून भेट म्हणून देऊ. तुम्ही माझ्या ह्या विनंतीचा नक्की मान ठेवाल ह्याची मला खात्री आहे, असं राज ठाकरेंनी या फेसबुक पोस्टद्वारे म्हटलं आहे.