'लक्ष्मीकांत असते तर त्यांनी मला राजकारणात येऊच दिलं नसतं...' प्रिया बेर्डेंनी सांगितलं कारण
By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2023 02:11 PM2023-11-30T14:11:04+5:302023-11-30T14:11:47+5:30
राष्ट्रवादी पक्षाला सोडचिठ्ठी दिल्यानंतर प्रिया बेर्डेंनी भाजपात प्रवेश केला.
मराठी सिनेमाला जागतिक पातळीवर ओळख मिळवून देण्यात अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे, सचिन पिळगावकर, महेश कोठारे सह अनेक कलाकार मंडळींचा मोठा वाटा आहे. या सर्वांनीच मराठी मनोरंजनसृष्टीत एक काळ गाजवला. या अभिनेत्यांसोबतच वर्षा उसगावकर, निवेदिता सराफ, प्रिया बेर्डे या अभिनेत्रीही काही कमी नव्हत्या. त्यांनीही मनोरंजनसृष्टी गाजवली. नुकतंच प्रिया बेर्डे (Priya Berde) यांनी लोकमत फिल्मीला मुलाखत दिली. लक्ष्मीकांत आज असते तर त्यांनी मला राजकारणात येऊच दिलं नसतं, असं त्या म्हणाल्या.
'लोकमत फिल्मी'च्या नो फिल्टर कार्यक्रमात प्रिया बेर्डेंनी दिलखुलासपणे संवाद साधला. प्रिया बेर्डे या राजकारणातही सक्रीय आहेत. राष्ट्रवादी पक्षाला सोडचिठ्ठी दिल्यानंतर प्रिया बेर्डेंनी भाजपात प्रवेश केला. आज लक्ष्मीकांत असते तर त्यांना या राजकारण प्रवेशाविषयी काय वाटले असते यावर त्या म्हणाल्या, 'लक्ष्मीकांत आज असते तर त्यांनी मला राजकारणात येऊ दिलं नसतं. ते म्हणाले असते तु तुझा संसार सांभाळ. या भानगडीत तू पडून नकोस. कारण तुझा तसा स्वभावच नाही. इतका फटकळ स्वभाव, सरळ तोंडावर बोलणारी बाई राजकारणात कशी असू शकते.'
त्या पुढे म्हणाल्या, 'पण माझं म्हणणं आहे की मी राजकारण म्हणून काम करत नाही तर मी सांस्कृतिक विभागात काम करते. मी कलाकारांसाठी काम करते हे माझं अगदी सरळ आहे.'
प्रिया बेर्डे यांना स्वानंदी आणि अभिनय ही दोन मुलं आहेत. अभिनयने आईवडिलांच्या पाऊलावर पाऊल ठेवत अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं आहे. तर स्वानंदीने रंगभूमीवर पदार्पण केलं आहे.