मराठमोळ्या समिधा गुरुची बॉलिवूडमध्ये एंट्री!
By ऑनलाइन लोकमत | Published: July 1, 2019 03:40 PM2019-07-01T15:40:59+5:302019-07-01T15:58:06+5:30
समिधा गुरु नाटक, मालिका वा चित्रपट या तिन्ही माध्यमांमध्ये काम केले आहे. आता ती हिंदी चित्रपटसृष्टीद्वारा आपली नवी ओळख निर्माण करू पाहतेय.
समिधा गुरु नाटक, मालिका वा चित्रपट या तिन्ही माध्यमांमध्ये काम केले आहे. आता ती हिंदी चित्रपटसृष्टीद्वारा आपली नवी ओळख निर्माण करू पाहतेय. सतत नावीन्याच्या शोधात असणाऱ्या दिग्दर्शक अभिनय देव यांच्या 'दुसरा' या आगामी हिंदी चित्रपटामध्ये 'समिधा गुरु'ची वर्णी लागली असून समिधासाठी एक नव्या माध्यमाचे कवाड खुले झाले आहे असं म्हटलं तर वावगं ठरू नये.
'कापूस कोंड्याची गोष्ट' या वास्तववादी चित्रपटासाठी राज्य पुरस्कारासह अनेक नामांकित पुरस्कारांवरही आपली मोहोर उमटवणाऱ्या या गुणी अभिनेत्रीने 'दुसरा' या हिंदी चित्रपटात एका राजस्थानी पारंपरिक-रूढीवादी कुटुंबाचे प्रतिनिधित्व करणारी स्त्री व्यक्तिरेखा साकारली आहे.
''कलाकार हा माध्यमांताराने अधिक निपुण होत जातो. अशी संधी चालून येणं हे तुमच्या पूर्वकार्याच्या शिदोरीवर बऱ्याचदा अवलंबून असतं. 'कापूस कोंड्याची गोष्ट', 'कायद्याचं बोला', 'लाल इश्क' यांसारखे उत्तोमोत्तम चित्रपट.. 'गेट वेल सून', 'तळ्यात-मळ्यात' ही दर्जेदार नाटकं तर 'अवघाचि सांसार', 'कमला', 'क्राईम पेट्रोल', 'जिवलगा' या आणि अशा अनेक मालिकां मला समृद्ध करत गेल्या. एकामागोमाग मिळत जाणाऱ्या संधीचं मी नेहमीच स्वागत केलं आणि आपल्यापरीने त्या भूमिकेला न्याय ही देण्याचा प्रयत्न केला ज्याचे फलित म्हणजे अभिनय देव यांच्या 'दुसरा'साठी माझी दाखल घेतली गेली असावी असं मी मानते.''
'दुसरा' हा चित्रपट एका क्रिकेटप्रेमी मुलीवर आधारित आहे. एका अशा मुलीच्या आवडी-निवडीवर हा चित्रपट आधाराला आहे जिथे मुलींनी कसं वागावं कसं वागू नये या दडपणात वाढवलं जातं. या मुलीच्या आईची भूमिका समिधाने साकारली असून तिने या भूमिकेसाठी विशेष मेहनत घेत राजस्थानी भाषा आणि लहेजा शिकली आहे. समिधा गुरुसोबत या चित्रपटात प्लबीता बोरठाकूर, अंकुर विकल यांच्या मुख्य भूमिका आपल्याला या चित्रपटात पाहायला मिळणार आहे.