Sayali Sanjeev : बाबांच्या उपचारासाठी पैसे हवे होते म्हणून मी..., सायली संजीवने सांगितला ‘तो’ भावुक प्रसंग
By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2022 03:58 PM2022-11-24T15:58:49+5:302022-11-24T15:59:16+5:30
Sayali Sanjeev : सायलीचे वडील आज या जगात नाहीत. सायली तिच्या वडिलांच्या खूप जवळ होती. दोघांचं एकमेकांशी अगदी घट्ट नातं होतं. आता सायलीने तिच्या बाबाची एक भावुक आठवण शेअर केली आहे...
झी मराठीवरील ‘काहे दिया परदेस’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेली मराठमोळी अभिनेत्री सायली संजीव (Sayali Sanjeev ) सोशल मीडियावर सतत चर्चेत असते. कधी सोशल मीडियावरच्या फोटोंमुळे, कधी टॅटूमुळे. तुम्हाला आठवत असेलच की, सायलीनं तिच्या बाबाच्या आठवणीत एक सुंदर टॅटू गोंदवून घेतला होता. बाबा तुझ्यासाठी, असं लिहित त्याचा फोटो तिनं शेअर केला होता. सायलीचे वडील आज या जगात नाहीत. सायली तिच्या वडिलांच्या खूप जवळ होती. दोघांचं एकमेकांशी अगदी घट्ट नातं होतं. आता सायलीने तिच्या बाबाची एक भावुक आठवण शेअर केली आहे.
अभिनेत्री सुलेखा तळवलकर यांच्या युट्युब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत सायली संजीवने जुन्या आठवणींना उजाळा दिला. या मुलाखतीत सुलेखा यांनी सायलीला तिच्या बाबाबद्दलची आठवण विचारली. यावर सायलीने त्यांच्या निधनापूवीर्ची एक आठवण सांगितली.
‘बाबा माझे आदर्श होते आणि आहेत. माझा बाबा ग्रेटचं होता. त्यांच्यासोबतच्या असंख्य आठवणी आहेत. बाबांचं निधन होण्यापूर्वीची एक आठवण मी सांगते. एखाद्याची इच्छाशक्ती किती उत्तम असू शकते हे मला यावरून कळालं. बाबांना कर्करोग होता. बाबा लवकरात लवकर बरे व्हावेत, अशी माझी इच्छा होती. बाबांच्या उपचाराची जबाबदारी मी घेतली होती. त्यांच्यावर उपचार करायचे होते म्हणून मी गाडी घेऊ शकले नाही. कर्करोगाच्या उपचारासाठी सगळे पैसे लागणार होते. त्यामुळे मी गाडी घ्यायचा प्लान रद्द केला होता. हे सगळं बाबांच्या डोक्यात होतं. त्यांनी जाण्याआधी पाडव्याला मला गाडी गिफ्ट केली. त्यावेळी त्यांना उठून बसताही येत नव्हतं. तरीही ते उठून बसले. आरटीजीएसच्या पेपरवर त्यांनी साईन केली. सगळे पैसे मला देऊन त्यांनी गाडी घ्यायला लावली. काहीही करून त्यांनी ती गाडी मला गिफ्ट दिली...,’ असं सायली संजीवने सांगितलं. हे सांगताना सायली काहीक्षण भावुक झालेली पाहायला मिळाली.