"आपल्या आयुष्याची किंमत शून्य आहे", घाटकोपर दुर्घटनेनंतर मराठी अभिनेत्रीची खरमरीत पोस्ट
By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2024 10:23 AM2024-05-15T10:23:46+5:302024-05-15T10:24:17+5:30
घाटकोपर दुर्घटनेनंतर सर्वच स्तरातून संताप व्यक्त केला जात आहे. शशांक केतकरनंतर आता मराठी अभिनेत्रीनेही पोस्ट शेअर केली आहे.
मुंबईत सोमवारी(१३ मे) वादळी वारा आणि पावसामुळे घाटकोपरमध्ये पेट्रोल पंपावर होर्डिंग कोसळून दुर्घटना घटली. १२० फूट * १२० फूट होर्डिंग कोसळून झालेल्या या दुर्घटनेत १४ जणांचा मृत्यू झाला आहे. तर ७० हून अधिक जण जखमी आहेत. या दुर्घटनेनंतर सर्वच स्तरातून संताप व्यक्त केला जात आहे. अभिनेत्री शिवानी सुर्वेने सोशल मीडियावर संतप्त पोस्ट शेअर केली आहे.
शिवानीने तिच्या इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. तिने शेअर केलेल्या पोस्टमध्ये "मुंबई महानगरपालिका म्हणते ते होर्डिंग अनधिकृत होतं आणि परवानगी विना रेल्वेच्या जागेवर लावलं गेलं होतं. सेंट्रल रेल्वेने असं सांगितलं की ते होर्डिंग रेल्वेच्या जागेवर नव्हतं आणि देशातील कुठल्याच रेल्वेशी संबंधित नाही. ४०*४० फूटाचे होर्डिंगच लावण्याची परवानगी आहे. हे होर्डिंग १०० फुटापेक्षा जास्त होतं", असं म्हटलं गेलं आहे. ही पोस्ट शेअर करत शिवानीने संताप व्यक्त केला आहे. "आपल्या आयुष्याची किंमत शून्य आहे...आणि हे खरं आहे", असं शिवानीने म्हटलं आहे.
घाटकोपर दुर्घटनेतील बचावकार्य अद्यापही सुरू आहे. बचावकार्य सुरू असतानाच पेट्रोल पंपाला आग लागली होती. काही वेळातच आग नियंत्रणात आणली असून पुन्हा बचावकार्याला सुरुवात झाली आहे. या दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना राज्य सरकारकडून ५ लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे.