'ड्रग्स पासून दूर राहा', शुभांगी गोखलेंनी लेकीला हात जोडून सांगितलं; ती लंडनला गेल्यावर...
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2024 14:13 IST2024-05-16T14:10:19+5:302024-05-16T14:13:32+5:30
सखी कॉलेजमध्ये गेल्यावर तसंच नंतर लंडनमध्ये गेल्यावर त्यांनी तिच्यावर कोणकोणती बंधनं घातली याचा खुलासा त्यांनी 'लोकमत फिल्मी'शी बोलताना केला.

'ड्रग्स पासून दूर राहा', शुभांगी गोखलेंनी लेकीला हात जोडून सांगितलं; ती लंडनला गेल्यावर...
मराठीतील दिग्गज अभिनेत्री शुभांगी गोखले यांची लेक सखी गोखले सुद्धा सिनेसृष्टीत काम करत आहे. या मायलेकीची जोडी तशी प्रेक्षकांची अत्यंत लाडकी. शुभांगी गोखले यांचा वेगळा चाहतावर्ग आहे. अनेक गाजलेल्या मालिकांमध्ये शुभांगी गोखले यांनी भूमिका साकारल्या आहेत. तर आता सखीही तिचं नशीब आजमावत आहे. सखीने परदेशात म्हणजेच लंडनमध्ये फोटोग्राफीचं शिक्षण घेतलं. लहानपणापासूनच सखीवर तिच्या आईने नेमकी कोणकोणती बंधनं घातली याचा खुलासा त्यांनी 'लोकमत फिल्मी'ला दिलेल्या मुलाखतीत केला.
शुभांगी गोखले या दिग्गज अभिनेते मोहन गोखलेंच्या पत्नी आहेत. सखी केवळ ७ वर्षांची असताना मोहन गोखलेंचं निधन झालं. यानंतर शुभांगी यांनी एकटीनेच सखीचा सांभाळ केला. सखी कॉलेजमध्ये गेल्यावर तसंच नंतर लंडनमध्ये गेल्यावर त्यांनी तिच्यावर कोणकोणती बंधनं घातली याचा खुलासा त्यांनी 'लोकमत फिल्मी'शी बोलताना केला. त्या म्हणाल्या, " सखी कॉलेजमध्ये गेल्यावर मी तिला सांगितलं होतं की मॅकडोनाल्ड्स, सबवे हे जंक फूड खाऊ नको. मला ते आवडायचं नाही. तसंच पब वगैरेचं खूप फॅड असतं. आपण किती नियंत्रण ठेवणार. तरी आम्ही गोरेगावात राहायचो. जर टाऊनमध्ये असतो तर काय माहिती शाळेपासूनच मुलांना या सवयी लागतात. तर ते मला आवडणार नाही हे मी तिला स्पष्ट सांगितलं होतं. फेस्टिव्हलमध्ये भाग घेणं, त्यासाठी रात्रंदिवस तालमी करणं हे चालू शकतं. पण बाकी गोष्टींवर वेळ आणि पैसा घालवणं मला पटणार नाही."
सखी नंतर लंडनला गेली तेव्हा मी तिला सांगितलं होतं की लंडन म्हणजे साऊथ बॉम्बेच्या १०० पट आहे. तिथे कशावरच नियंत्रण नसतं. तिथे ड्रग्सचं प्रमाण फार असतं. आपण त्यात कसे अडकले जातो कळत नाही आणि आयुष्य उद्धवस्त होतं. मी तिला हात जोडून सांगितलं होतं की मी तुझ्यासाठी काहीही करेन पण याच्यापासून दूर राहा. सखी शहाणी आहे म्हणून पण तिचे २ फ्लॅटमेट त्यात अडकले होते. त्यात ती इतकी दूर आहे. मी अजून काय काय सांभाळणार आहे. भीती वाटते ना. त्यामुळे हे तू करु नको. त्या व्यसनांचा आपल्याशी काहीही संबंध नाही हे मी तिला बोलले होते." यावर सखी म्हणाली, 'मुळात व्यक्ती म्हणून मी इतकी भित्री आहे की ड्रग्स म्हणलं की मी घाबरतेच. पण ड्रग्स वगरे आजकाल कुठेही गेलं तरी आहेच."