लेकीसाठी सुकन्या कुलकर्णी पणाला लावणार होत्या करिअर; इंडस्ट्री सोडण्याचा घेतला होता निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Published: January 7, 2024 08:53 AM2024-01-07T08:53:56+5:302024-01-07T08:54:51+5:30
Sukanya kulkarni-mone: 'या' एका कारणामुळे सुकन्या कुलकर्णी घेणार होत्या मोठा निर्णय
'आभाळमाया' या मालिकेत सुधा ही भूमिका साकारुन घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे सुकन्या कुलकर्णी-मोने (sukanya kulkarni-mone). अनेक गाजलेल्या मालिका, नाटक, सिनेमा यांच्या माध्यमातून त्यांनी कायमच प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. अलिकडेच त्यांचा बाईपण भारी देवा हा सुपरहिट सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला. या सिनेमान बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई केली. या चित्रपटासोबतच सध्या सुकन्या त्यांच्या लेकीमुळे जुलियामुळे चर्चेत येत आहे. एकेकाळी सुकन्या कुलकर्णी या त्याच्या लेकीसाठी चक्क करिअर सोडायला तयार झाल्या होत्या.
अलिकडेच सुकन्या कुलकर्णी-मोने यांनी 'राजश्री मराठी'च्या 'स्टारकिड्स' या सेगमेंटमध्ये हजेरी लावली होती. यावेळी त्यांच्यासोबत ज्युलिया आणि संजय मोने सुद्धा होते. या मुलाखतीमध्ये त्यांनी ज्युलियाचं बालपण कसं गेलं, तिचं संगोपन कसं केलं हे सांगितलं. हेच सांगत असताना ज्युलिया लहान असताना तिला पाळणाघरात ठेवण्याच्या त्या साफ विरोधात होते. त्यामुळेच लेकीला पाळणाघरात न ठेवता वेळप्रसंगी करिअर सोडेन अशी भूमिका त्यांनी घेतली होती.
नेमकं काय म्हणाल्या सुकन्या?
"आमच्याकडे मुलांना सांभाळायला २४ तास बाई आहे किंवा मी पुढे चालतीये आणि माझ्यामागे एक बाई माझ्या बाळाला घेऊन येतीये. हे दृश्यच मला आवडत नाही. ज्यावेळी हिचा जन्म झाला त्यावेळी माझ्या सासूबाई ७५ वर्षांच्या होत्या. त्यामुळे त्यांच्याकडून काय अपेक्षा करणार. किंवा, माझ्या आईचंही वय बरंच होतं. म्हणून, एका पॉईंटला मी ठरवलं होतं की जर का हे सगळं नाही ना जमलं तर मी काम सोडेन आणि, मग घरात बसेन. तेव्हा जसं जमेल तसं आपण जगू", असं सुकन्या म्हणाल्या.
पुढे त्या सांगतात, "माझी मुलगी पाळणाघरात जाते किंवा ती नॅनीच्या जीवावर आहे हे मला पटत नव्हतं. तिने दोन हाताने पोळी तोडलेली मला नाही चालणार किंवा तिने उजव्या हाताने पाणी प्यायलेलं मला नाही चालणार. हे सगळं माझ्या डोक्यात फिक्स होतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आमच्या आनंदासाठी आम्ही तिला जन्माला घातलंय. त्यामुळे तिच्यासाठी वेळ हा काढलाच पाहिजे. ती आमची प्रायोरिटी आहे."
दरम्यान, ज्युलिया मोठी होईपर्यंत संजन मोने आणि सुकन्या मोने यांनी एकत्र काम करणं कटाक्षाने टाळलं होतं. कारण, दोघांचं शूट एकाच वेळी लागलं तर ज्युलियाकडे पाहणार कोण हा प्रश्न होता. इतकंच नाही तर सुकन्या यांना जास्त काम असेल किंवा त्यांना कामानिमित्त बाहेरगावी जावं लागत असेल तर मी ज्युलियाची जबाबदारी घेतो असंही संजय मोने यांनी सुकन्या यांना सांगितलं होतं.