"मला तुझा खुप अभिमान.."; सुलेखा तळवलकरांच्या लेकीचा कॉलेजमध्ये या खास कारणाने झाला सन्मान
By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2024 11:11 AM2024-04-14T11:11:33+5:302024-04-14T11:13:31+5:30
सुलेखा तळवलकर यांच्या लेकीला कॉलेजमधून खास सन्मान मिळाला आहे. त्यामुळे सुलेखा यांनी भावूक पोस्ट लिहित लेकीचं कौतुक केलंय (sulekha talwalkar)
सुलेखा तळवलकर या मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री. सुलेखा यांनी आजवर अनेक सिनेमा, मालिकांमधून लोकांचं प्रेम मिळवलंय. सुलेखा यांचा युट्यूबवर 'दिल के करीब' हा शो सुद्धा लोकप्रिय आहे. सुलेखा या त्यांच्या आयुष्यातील विविध अपडेट्स सोशल मीडियावर शेअर करत असतात. सुलेखा यांनी सोशल मीडियावर नुकतीच एक पोस्ट केलीय. यात त्यांनी लेकीच्या कामगिरीचं कौतुक केलंय.
सुलेखा यांच्या लेकीला कॉलेजमध्ये 'स्टूडन्ट ऑफ द इयर' हा पुरस्कार मिळाला. सलग २ वर्ष सुलेखा यांची लेक टिआने कॉलेजमध्ये हा पुरस्कार पटकावला आहे. लेकीचा फोटो शेअर करुन सुलेखा लिहितात, "टिया. मला वाटते मी सर्वात भाग्यवान आणि आनंदी आई आहे. कोणत्याही आईला स्वप्नवत वाटेल अशी मुलं मला देवाच्या आशीर्वादाने मिळाली आहेत. बाळा, तू स्वतःला ज्याप्रकारे एक हुशार, सुंदर, मोहक, प्रतिभावान तरुणी म्हणून तयार केले आहेस ते कमाल आहे. तू अविश्वसनीय आहेस. माझे तुझ्यावर खूप प्रेम आहे बाळा."
सुलेखा पुढे लिहितात, "हा पुरस्कार मिळवल्याबद्दल मनःपूर्वक अभिनंदन. सलग 2 वर्षे "स्टूडन्ट ऑफ द इयर". व्वा.. तुझ्या आईला तुझा अभिमान वाटतो..पिल्लू..
देव तुला खुप आशीर्वाद देईल. अशीच भरारी घेत राहा. आणि मला खात्री आहे की तू यशस्वी होशील. आईकडून तुला खुप प्रेम." सर्वांनी कमेंटमध्ये सुलेखा यांच्या लेकीचं अभिनंदन केलंय. सुलेखा सध्या 'मुरांबा' मालिकेत अभिनय करत आहेत.