जबरदस्त! तेजस्विनी पंडितची साऊथमध्ये एन्ट्री, सिनेमातील फर्स्ट लूक आऊट
By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2024 01:37 PM2024-08-12T13:37:24+5:302024-08-12T13:38:04+5:30
मराठमोळी तेजस्विनी पंडित गाजवणार साऊथ, 'या' सिनेमातून करतेय पदार्पण, फर्स्ट लूक समोर
अभिनय, सौंदर्य आणि अदांनी प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेत मराठी सिनेसृष्टीत स्वत:चं स्थान निर्माण करणारी अभिनेत्री म्हणजे तेजस्विनी पंडित. अनेक मालिका आणि सिनेमांमध्ये तिने काम केलं आहे. केवळ मराठीच नाही तर बॉलिवूडमध्येही तिने अभिनयाची छाप पाडली. 'आदिपुरुष' या हिंदी सिनेमात तेजस्विनी झळकली होती. मराठी आणि हिंदी सिनेसृष्टी गाजवल्यानंतर आता तेजस्विनी साऊथ सिनेसृष्टीत एन्ट्री घेत आहे.
तेजस्विनी सुप्रसिद्ध दिग्दर्शक एस. एस. राजामौलींच्या सिनेमातून साऊथ इंडस्ट्रीमध्ये पदार्पण करत आहे. या सिनेमातील तिचा पहिला लूक समोर आला आहे. केस विस्कटलेले, चेहऱ्यावर जखम आणि ब्लँकेट घेतलेला असा सिनेमातील तिचा फर्स्ट लूक आहे. 'अहो विक्रमार्का' असं तेजस्विनीच्या या साऊथ सिनेमाचं नाव आहे. या सिनेमात ती भवानी शंकर ही भूमिका साकारताना दिसणार आहे. सिनेमाचं पोस्टर शेअर करत तेजस्विनीने ही माहिती चाहत्यांना दिली आहे.
"जेव्हा विश्वासाला तडा जातो, तेव्हा त्याची जागा धैर्य भरून काढते...तेलगू चित्रपटातील माझं पदार्पण. शुभेच्छा आणि आशिर्वाद असुद्या", अस कॅप्शन तिने या पोस्टला दिलं आहे. तेजस्विनीला साऊथ सिनेमात पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. तिच्या या पोस्टवर कमेंट करत चाहत्यांनी तेजस्विनीला शुभेच्छा दिल्या आहेत.
'अहो विक्रमार्का' या सिनेमात अभिनेता प्रविण तरडे मुख्य खलनायकाची भूमिका साकारताना दिसणार आहेत. प्रविण तरडे यांचादेखील हा पहिलाच साऊथ सिनेमा आहे. एस. एस. राजामौली फिल्म्सचे सहाय्यक दिग्दर्शख त्रिकोटी पेटा यांनी सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. तर डॉ. मिहीर कुलकर्णी यांनी निर्मिती केली आहे. तेलुगु, हिंदी, तमिळ, कन्नड, मल्याळम, बंगालीसह मराठी अशा एकूण ७ भाषांमध्ये हा सिनेमा प्रदर्शित केला जाणार आहे. ३० ऑगस्टला हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.