वंदना गुप्ते रॉक, सासू-सासरे शॉक्ड! पहिल्याच भेटीत अभिनेत्रीने म्हटली होती 'ही' लावणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2023 17:19 IST2023-07-05T17:17:53+5:302023-07-05T17:19:06+5:30

Vandana gupte:वंदना गुप्ते पहिल्यांदा त्यांच्या सासू-सासऱ्यांना भेटल्या त्यावेळी त्यांनी या भेटीत चक्क लावणी म्हणून दाखवली होती.

marathi actress vandana gupte first meeting with in laws share her experience | वंदना गुप्ते रॉक, सासू-सासरे शॉक्ड! पहिल्याच भेटीत अभिनेत्रीने म्हटली होती 'ही' लावणी

वंदना गुप्ते रॉक, सासू-सासरे शॉक्ड! पहिल्याच भेटीत अभिनेत्रीने म्हटली होती 'ही' लावणी

मराठी कलाविश्वातील दिलखुलास व्यक्तीमत्व म्हणजे वंदना गुप्ते ( vandana gupte). आजवरच्या कारकिर्दीमध्ये वंदना गुप्ते यांनी अनेक गाजलेल्या सिनेमा,मालिकांमध्ये काम केलं आहे. त्यामुळे कलाविश्वात त्यांचा दांडगा वावर असल्याचं पाहायला मिळत. काही दिवसांपूर्वीच त्यांचा बाईपण भारी देवा हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला. त्यामुळे सध्या त्या चर्चेत येत आहेत. यामध्येच त्यांची एक मुलाखत चर्चेत आली आहे. या मुलाखतीमध्ये त्यांनी त्यांच्या सासू-सासऱ्यांसोबतच्या पहिल्या भेटीचा किस्सा सांगितला आहे.

अलिकडेच वंदना गुप्ते यांनी 'बाईपण भारी देवा'च्या निमित्ताने होम मिनिस्टर या कार्यक्रमात हजेरी लावली होती. या कार्यक्रमामध्ये त्यांनी त्यांच्या नवऱ्याविषयी आणि सासरच्या मंडळींविषयी भाष्य केलं. यात सासू-सासऱ्यांसोबतची पहिली भेट कशी लक्षात राहण्यासारखी झाली हे सांगितलं. 

'तुम्ही राग कसा व्यक्त करता'? असा प्रश्न आदेश बांदेकर यांनी वंदना गुप्ते यांना विचारला. त्यावर, "साधारणपणे राग व्यक्त न करताच ५० वर्ष संसार केला आहे. नाही तर झालाच नसता. पहिल्यांदा मी सासू-सासऱ्यांना भेटायला गेले त्यावेळी लावणीच म्हणून दाखवली. त्यामुळे त्यांना कळलं की आपल्या घरी काय येतंय. आमचं आम्हीच ठरवलं होतं, त्यामुळे फक्त आईवडिलांना भेटायचं होतं. माझ्या आईने मला खूप शिकवून पाठवलं होतं की कसं वागायचं, कसं बोलायचं, पाया पडायचं वगैरे.तिने सांगितलं त्याप्रमाणे मी केलं सुद्धा", असं वंदना गुप्ते म्हणाल्या.

पुढे त्या म्हणतात, "माझे सासू-सासरे दोघंही माझ्या आईच्या गाण्याचे भक्त. त्यामुळे माणिकबाईंची मुलगी आपल्याकडे सून म्हणून येतीये असं मुलगा म्हणतोय. तर खरंच तसं आहे का म्हणून पाहुयात या विचाराने त्यांनी मला गाणं येतं का? असं विचारलं. त्यांना वाटलं मी आईसारखं भजन, अभंग असं काही तरी म्हणून दाखवेन. पण, मी पाडाला पिकलाय आंबा म्हणून दाखवलं. ते दोघ माझ्या समोर होते आणि माझा होणारा नवरा, ही काय म्हणतीये असा विचार करुन माझ्याकडे पाहात होता. पण, तेव्हापासून त्याने जी मान खाली घातलीये ती अजूनही वर केलेली नाही."

दरम्यान, वंदना गुप्ते या मराठी कलाविश्वातील प्रसिद्ध आणि नावाजलेल्या अभिनेत्री आहेत. मराठीसह हिंदी कलाविश्वातही त्यांनी काम केलं आहे. त्यांनी आजवरच्या कारकिर्दीत नाटक, मालिका, सिनेमा या प्रत्येक माध्यमात काम केलं आहे.
 

Web Title: marathi actress vandana gupte first meeting with in laws share her experience

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.