मराठी कलाकार करताहेत पुन्हा निवडणुकीची मागणी?, ट्विटरवर ट्रेंड होतोय #पुन्हा निवडणुक ?
By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2019 04:10 PM2019-11-15T16:10:28+5:302019-11-15T16:11:10+5:30
विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर सत्तास्थापनेसाठी निर्माण झालेला पेच अद्याप सुटलेला नाही. त्यानंतर आता अचानक बरेच मराठी कलाकार ट्विटरवर पुन्हा निवडणुक? असा हॅशटॅग वापरत असल्याचं पहायला मिळालं.
विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर सत्तास्थापनेसाठी निर्माण झालेला पेच अद्याप सुटलेला नाही. त्यानंतर आता अचानक बरेच मराठी कलाकार ट्विटरवर पुन्हा निवडणुक? असा हॅशटॅग वापरत असल्याचं पहायला मिळालं. त्यामुळे सोशल मीडियावर एकीकडे चाहत्यांमध्ये गोंधळ उडाला तर दुसरीकडे वाद होताना पहायला मिळाला. काहींनी कलाकारांच्या बाजूने आणि काहींनी विरोधात ट्विटरवर प्रतिक्रिया द्यायला सुरूवात केली.
मराठी चित्रपटसृष्टीतील सिद्धार्थ जाधव, सई ताम्हणकर, सोनाली कुलकर्णी, अंकुश चौधरी, सिद्धार्थ चांदेकर या मराठी कलाकारांनी आपापल्या ट्विटर हँडलवर फक्त एवढा एकच हॅशटॅग लिहिले होते. त्यामुळे नेमकं असा हॅशटॅग का वापरला असेल, असा प्रश्न सगळ्यांना पडला होता. सध्याच्या राजकीय घडामोडींवर मराठी कलाकारांनी दिलेली ही प्रतिक्रिया आहे, असं समजून अनेकांनी या कलाकारांना पाठिंबा दिला, तर अनेकांनी ट्रोलही केलं.
मराठी कलाकारांना घेऊन भाजपने रचलेला हा डाव असल्याचे आरोप सुरू झाले आहेत. काही युजर्सनी मनुवादी म्हणून या मराठी कलाकारांवर टीका केली.
काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी या प्रकारच्या सोशल मीडियाच्या वापरावर आक्षेप नोंदवला आहे. त्यांनी ट्विट केलं की, प्रथितयश मराठी कलाकार एकाच वेळी एकच हॅशटॅग वापरून राजकीय ट्वीट करतात हे आश्चर्याचे तर आहेच पण @BJP4Maharashtra ची propaganda मशीनरी किती पोचलेली आहे हे यातून दिसून येते. या कलाकारांनी आपला #भाजपा कडून वापर होऊ देऊ नये.
प्रथितयश मराठी कलाकार एकाच वेळी एकच हॅशटॅग वापरून राजकीय ट्वीट करतात हे आश्चर्याचे तर आहेच पण @BJP4Maharashtra ची propaganda मशीनरी किती पोचलेली आहे हे यातून दिसून येते. या कलाकारांनी आपला #भाजपा कडून वापर होऊ देऊ नये. pic.twitter.com/sE58NqmD8l
— Sachin Sawant (@sachin_inc) November 15, 2019
कलाकार पुन्हा निवडणुक? हे हॅशटॅग चित्रपटाच्या प्रमोशनसाठी वापरत असतील, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. जानेवारीत प्रदर्शित होणाऱ्या धुरळा या मराठी चित्रपटाच्या प्रमोशनसाठी ही युक्ती वापरली गेल्याचं बोललं जातं आहे.