"...म्हणून 'पाणी'साठी मराठवाड्याच्या मातीतले कलाकार निवडले" आदिनाथ कोठारेने सांगितला 'तो' किस्सा
By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2024 02:41 PM2024-10-18T14:41:05+5:302024-10-18T14:46:31+5:30
प्रियांका चोप्रा जोनास (Priyanka Chopra) आणि राजश्री एंटरटेनमेंट आणि पर्पल पेबल पिक्चर्सचा नवा चित्रपट 'पाणी' आज १८ ऑक्टोबरला सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे.
Adinath Kothare : प्रियांका चोप्रा जोनास (Priyanka Chopra) आणि राजश्री एंटरटेनमेंट आणि पर्पल पेबल पिक्चर्सचा नवा चित्रपट 'पाणी' आज १८ ऑक्टोबरला सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. गावात पाणी नाही म्हणून ज्याला मुलीने लग्नासाठी नकार दिला तिच्यासाठी गावात पाणी आणणाऱ्या अवलियाची ही गोष्ट सिनेमात मांडण्यात आली आहे. सिनेमाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या पसंतीस पडल्याचं पाहायला मिळतंय. दरम्यान, पाणी मध्ये बरेचसे नवे चेहरे पाहायला मिळत आहेत. यानिमित्ताने 'पाणी' सिनेमाच्या टीमशी 'लोकमत फिल्मी'ने खास संवाद साधला. अशातच या चित्रपटात मराठवाड्यातील नवोदित कलाकार निवडण्यामागे काय हेतू होता यावर आदिनाथ कोठारेने(Adinath Kothare )भाष्य केलं आहे.
नुकतीच आदिनाथ कोठारेने 'लोकमत फिल्मी'ला मुलाखत दिली. या मुलाखतीत अभिनेता म्हणाला, "माझा असा एक अट्टाहास होता की 'पाणी' या चित्रपटासाठी मराठवाड्यातील कलाकार कास्ट करूया. यासाठी तिकडचीच माणसं आपण कास्ट केली पाहिजेत, असं मला वाटत होतं. दोन वर्षांपूर्वी मराठवाड्यातील एका एकांकिका स्पर्धेसाठी मी तिथे गेलो होतो. त्या स्पर्धेच्या परिक्षक म्हणून मला बोलावण्यात आलं होतं. त्या स्पर्धेमध्ये 'पाझर' नावाची एकांकिका होती. त्या एकांकिकेला अनेक बक्षीसं मिळाली. त्यामध्ये ज्या मुलांनी काम केलं ते सगळेजण 'पाणी' चित्रपटात कास्ट झाली. ते नट खूप कमाल होते. औरंगाबाद तसेच परभणी येथील ती मुलं होतं. तरीही कलाकार कमी पडत होते. कारण पाणी चित्रपट म्हणजे अख्या गावाची गोष्ट आहे. हनुमान केंद्रे सगळ्या गावाला एकत्र आणतो. त्यासाठी आम्ही मराठवाड्यातीही काही वर्कशॉप घेतले आणि त्यानंतर नंदुरबारमध्येही वर्कशॉप्स घेतले होते. तेव्हा जवळपास ४ ते ५ महिन्यांनी कलाकारांची निवड करण्यात आली".
'पाणी' ही हनुमंत केंद्रे यांची कथा आहे. नांदेडचे हनुमंत हे राज्यात 'जलदूत' म्हणून ओळखले जातात. आदिनाथ कोठारे त्यांची भूमिका साकारताना दिसणार आहे. हनुमंत केंद्रे यांचे मराठवाड्यातील दुष्काळी भागातील अनोखं कार्य या चित्रपटातून प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.