"शासनाला यासाठी दोष देत नाही, पण...", नाट्यगृहांच्या दुरावस्थेबाबत गिरीश ओक यांनी व्यक्त केली चिंता
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2025 13:10 IST2025-03-28T13:06:03+5:302025-03-28T13:10:13+5:30
मराठी सिनेइंडस्ट्रीतील ज्येष्ठ अभिनेते गिरीश ओक (Girish Oak) यांनी विविध भूमिका साकारुन रसिकांच्या मनात आपलं स्थान निर्माण केलं आहे.

"शासनाला यासाठी दोष देत नाही, पण...", नाट्यगृहांच्या दुरावस्थेबाबत गिरीश ओक यांनी व्यक्त केली चिंता
Girish Oak : मराठी सिनेइंडस्ट्रीतील ज्येष्ठ अभिनेते गिरीश ओक (Girish Oak) यांनी विविध भूमिका साकारुन रसिकांच्या मनात आपलं स्थान निर्माण केलं आहे. अनेक गाजलेल्या मराठी चित्रपटांमध्ये त्यांनी काम केलं आहे. 'अग्गबाई सासुबाई',' जुळून येती रेशीमगाठी' यांसारख्या अनेक मालिकांमधून ते घराघरांत पोहोचले. सध्या गिरीश ओक हे 'लाखात एक आमचा दादा' मालिकेमध्ये मुख्य भूमिकेत पाहायला मिळत आहेत. गिरीश ओक हे त्यांच्या अभिनयासह स्पष्टवक्तेपणामुळे अनेकदा चर्चेत येतात. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये राज्यातील नाट्यगृहांच्या अवस्थेबाबत भाष्य केलं आहे.
गिरिश ओक यांनी 'इट्स मज्जा' सोबत बोलताना अनेक गोष्टींवर मत मांडलं. त्याचबरोबर नाट्यगृहांच्या दुरावस्थेबाबत चिंता व्यक्त करत अभिनेते म्हणाले, "तांत्रिकदृष्ट्या बऱ्याच गोष्टींनी अजून आपण मागे आहोत. मी शासनाला यासाठी दोष देत नाही. पण ज्यांनी कुणी या गोष्टी करायला पाहिजे ते खरंतर करायला हवं. ज्या ठिकाणी नाट्यप्रयोग होतो त्या ठिकाणच्या नाट्यगृहांची अवस्था फार वाईट आहे. ज्या प्रमुख शहरांतील नाट्यगृह आहेत त्याव्यतिरिक्त गावांमधील जी नाट्यगृह आहेत त्याच्याकडे लक्ष द्यायला हवं, तर बाहेर प्रयोग होऊ शकतील.जोपर्यंत बाहेर प्रयोग होत नाहीत तोपर्यंत व्यावसायिकदृष्ट्या नाटक प्रोड्यूसरला परवडत नाही."
त्यानंतर अभिनेते म्हणाले, "तेव्हा यासाठी काय करावं समजत नाही. मी अनेक ठिकाणी याबद्दल बोललो पण ते व्हायला हवं. एकीकडे शासन म्हणतं प्रत्येक जिल्ह्याच्या एक ठिकाणी नाट्यगृह उभारणार किंवा उभारलेलं आहे. पण, त्यांची अवस्था खूप वाईट आहे. त्यासाठी वेगळी काहीतरी पद्धत निर्माण व्हायला हवी. त्यादृष्टीने प्रयत्न करायला पाहिजेत. एक अभिनेता म्हणून नाहीतर एक रंगभूमीचा भाग म्हणून मी बोलतो आहे. कला, व्यावसायिक नाटक जिवंत राहावं असं वाटत असेल तर, आपल्याला प्रयत्न करणं गरजेचं आहे." अशी भावना त्यांनी व्यक्त केली."