निवडणूक प्रचार, भाषणांना सेन्सॉर का नाही? मराठी अभिनेत्याचा थेट सवाल, म्हणाले-"सध्या फार पंचाईत..."
By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2024 12:27 PM2024-11-19T12:27:19+5:302024-11-19T12:36:54+5:30
सध्या राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे.
Girish Oak Post: विधानसभा निवडणुकीची (Maharashtara Aseembley Election 2024) रणधुमाळी सुरू आहे. राज्यात २० नोव्हेंबर रोजी विधानसभेसाठी मतदान प्रक्रिया पार पडत आहे. तर २३ नोव्हेंबरला महाराष्ट्र विधानसभेचा निवडणुकीचा निकाल लागणार असून अखेर काल सोमवारी संध्याकाळी ६ वाजता प्रचारतोफा थंडावल्या. आता मतदानादिवशी जनतेचा कौल कोणाला मिळणार, याकडे राज्याचे लक्ष लागले आहे. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत उमेदवारांना पाठिंबा देण्यासाठी मराठी कलाविश्वातील मंडळीही मैदानात उतरली आहे. तसेच काहीजण सामाजिक, राजकीय मुद्द्यावर ठामपणे आपलं मत मांडताना दिसत आहे. दरम्यान, सोशल मीडियावर जेष्ठ अभिनेते गिरीश ओक (Girish Oak) यांनी शेअर केलेली पोस्ट लक्ष वेधून घेत आहे.
अलिकडेच गिरीश ओक यांनी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत मतदारांना दोन भाबडे प्रश्न विचारले होते. त्यापोस्टद्वारे त्यांनी अनेक प्रशासनाकडून देण्यात येणाऱ्या आश्वासनांबद्दल मत मांडलं होतं. त्याचीही चांगली चर्चा रंगली होती. दरम्यान, नुकतीच गिरीश ओक यांनी आपल्या फेसबुक पेजवर पुन्हा लक्ष वेधणारी पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी लिहलंय, "मला पडलेला अजून एक भाबडा प्रश्न" चित्रपटांना, नाटकांना सेन्सॅार आहे तसं या निवडणूक प्रचार भाषणांना नाही का किंवा का नाही? अहो, सध्या फार पंचाईत होते मुलांबरोबर कुठल्याही बातम्यांच्या चॅनलवर ही भाषणं बघताना,ऐकताना. त्या भाषणांमधील नको, नको त्या शब्दांचे, हातवाऱ्यांचे अर्थ विचारतात मुलं. त्यापेक्षा चित्रपटाच्या आधी जसं पेरेंटल गायडंस १३+ १६+ १८+ येतं तसं निवडणूक आयोगानी या भाषणांच्या आधी टाकलं तर बरं होईल नाही का? का तर आम्हाला तर कळलंच आहे, कुठले राजकीय जेष्ठ लोकप्रतिनिधी किती अनपार्लमेंटरी बोलतात ते मुलांनाही कळायला नको म्हणून हो! एक सुजाण नागरिक पेरेंटल जबाबदारी."
गिरीश ओक यांनी शेअर केलेल्या पोस्टवर नेटकऱ्यांनी लाईक आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. त्यांनी या पोस्टद्वारे मांडलेला मुद्दा बऱ्याच जणांना पटलेला दिसतोय.