दिव्यांग मुलांसोबत प्रथमेश-क्षितीजाने साजरी केली लग्नानंतरची पहिली दिवाळी; नेटकऱ्यांकडून होतंय कौतुक

By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2024 11:59 AM2024-10-31T11:59:58+5:302024-10-31T12:03:37+5:30

दीपावली (Diwali) हा प्रकाशाचा, चैतन्याचा उत्सव आहे. सध्या प्रत्येकजण दिवाळी साजरी करण्यात मग्न आहे.

marathi cinema actor prathamesh parab and wife kshitija celebrates first diwali after marriage with children with disabilities post viral on social media | दिव्यांग मुलांसोबत प्रथमेश-क्षितीजाने साजरी केली लग्नानंतरची पहिली दिवाळी; नेटकऱ्यांकडून होतंय कौतुक

दिव्यांग मुलांसोबत प्रथमेश-क्षितीजाने साजरी केली लग्नानंतरची पहिली दिवाळी; नेटकऱ्यांकडून होतंय कौतुक

Prathamesh Parab : दीपावली (Diwali) हा प्रकाशाचा, चैतन्याचा उत्सव आहे. सध्या प्रत्येकजण दिवाळी साजरी करण्यात मग्न आहे. सर्वसामान्यांपासून मनोरंजनविश्वातील कलाकार मंडळींही मोठ्या उत्साहाने सण साजरे करत असतात. दरम्यान, सोशल मीडियावर अभिनेता प्रथमेश परबने(Prathamesh Parab) दिवाळी  निमित्ताने पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टने अनेकांचं लक्ष वेधलं आहे.  प्रथमेश-क्षितीजाने लग्नानंतरची पहिली दिवाळी साजरी केली आहे.


प्रथमेश परबने त्याच्या पत्नीसह यंदाची दिवाळी मुंबईतील खारदांडा येथील 'Sec Day school' मध्ये साजरी केल्याचं पाहायला मिळतंय. यानिमित्ताने तेथील दिव्यागं मुलांची दिवाळी त्यांनी गोड केली. प्रथमेश-क्षितीजाच्या या निर्णयाचं नेटकऱ्यांनी कौतुक केलं आहे. 

नुकतीच प्रथमेश परबने इन्स्टाग्रावर पोस्ट शेअर करत याबद्दल माहिती दिली. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत अभिनेत्याने त्यामध्ये लिहलंय, "आयुष्यातील प्रत्येक पहिली गोष्ट ही कायम स्पेशल असते. त्यातून लग्नानंतरची पहिली दिवाळी म्हटलं तर ती अजून स्पेशल व्हायला हवी. म्हणूनच आम्ही हा दिवस स्पेशल करण्याचा प्रयत्न केला 'Sec Day school', खारदांडा येथील मुलांसोबत.त्यांच्या चेहऱ्यावरचं गोड हसू, चेहऱ्यावरची प्रचंड सकारात्मकता, आपल्याकडे काहीतरी कमी आहे यापेक्षा आपल्याकडे काहीतरी वेगळं आहे आणि त्याचा सहजपणे केलेला स्वीकार, त्यांच्या वागण्यातून दिसतो.आपल्याकडे सगळं असून आपण लहानसहान गोष्टींची किती सहज तक्रार करतो ना! पण, या मुलांकडे बघून जाणवतं, की तक्रार करण्यापेक्षाही, आयुष्यात कृतज्ञ राहण्यासाठी बरीच कारणं आहेत, फक्त ती शोधता आली पाहिजेत".

पुढे प्रथमेशने म्हटलंय, "जेव्हा आम्ही या मुलांना भेटलो, तेव्हा काही जण म्हणाले , अरे पीटर भैया , काही म्हणाले, दगडू दादा, पण त्या व्यतिरिक्त कित्येक मुलांनी सिनेमा कधी बघितलाच नव्हता. त्यांच्यासाठी आम्ही होतो, आपल्यासोबत दिवाळी साजरी करण्यासाठी आलेले एक ताई दादा आणि खरंतर तेच पुरेसं होत. या मुलांसाठी, शाळेने, एक स्पेशल दिवाळी बाजार आयोजित केला होता. मुलांनी ,पणत्यांवर सुरेख पेंटिंग केलं, छान छान ग्रीटिंग कार्ड्स बनवले, रांगोळीचे रंग पॅक केलं, त्यांची विक्री केली. बरं जितकं कौतुक या मुलांचं आहे, तितकंच त्यांच्या पालकांचं आणि शिक्षकांचं देखील आहे. @sonaalibane सोनाली ताई तुमचं खूप खूप कौतुक आणि मनापासून आभार! दिवाळीच्या झगमगाटात,दिव्यांच्या लखलखटात,फटाक्यांच्या आतषबाजीत सुद्धा आज फार शांतता आणि प्रसन्नता जाणवतेय. तक्रारीच्या विचारांच वादळ शांत झालंय आणि आयुष्याच्या रांगोळीत चैतन्यांचे रंग भरल्यासारखे वाटतं आहेत".असं कॅप्शन देत प्रथमेशने ही पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे.

Web Title: marathi cinema actor prathamesh parab and wife kshitija celebrates first diwali after marriage with children with disabilities post viral on social media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.