VIDEO: प्रथमेश परब अन् क्षितिजाने थायलंडमध्ये 'असा' साजरा केला 'मराठी भाषा गौरव दिन'; होतंय कौतुक

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2025 12:28 IST2025-02-27T12:22:51+5:302025-02-27T12:28:04+5:30

आज संपूर्ण राज्यभर 'मराठी भाषा गौरव दिन' मोठ्या उत्साहाने आणि जल्लोषाने साजरा करण्यात येत आहे.

marathi cinema actor prathmesh parab wife kshitija ghosalkar shared post on the ocassion of marathi bhasha gaurav din 2025 netizens praised  | VIDEO: प्रथमेश परब अन् क्षितिजाने थायलंडमध्ये 'असा' साजरा केला 'मराठी भाषा गौरव दिन'; होतंय कौतुक

VIDEO: प्रथमेश परब अन् क्षितिजाने थायलंडमध्ये 'असा' साजरा केला 'मराठी भाषा गौरव दिन'; होतंय कौतुक

Marathi Bhasha Gaurav Din 2025: २७ फेबुवारी हा कुसुमाग्रजांचा जन्मदिवस 'मराठी भाषा गौरव दिन' (Marathi Bhasha Gaurav Diwas 2025) म्हणून साजरा केला जातो. हा दिवस आपल्या मायबोलीचा सन्मान करण्याचा दिवस आहे. आज संपूर्ण राज्यभर हा दिवस मोठ्या उत्साहाने आणि जल्लोषाने साजरा करण्यात येत आहे. याचनिमित्ताने मराठी कलाकार सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना मराठी भाषा गौरव दिनाच्या शुभेच्छा देताना दिसत आहेत. अशातच 'टाईमपास' फेम अभिनेता प्रथमेश परबने आणि त्याची पत्नी क्षितीजाने परदेशात मराठी भाषा गौरव दिन अनोख्या पद्धतीने साजरा केला आहे. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत प्रतिजाने चाहत्यांना मराठी भाषा गौरव दिनाच्या शुभेच्छा देखील दिल्या आहेत. 


सध्या अभिनेता प्रथमेश परब त्याच्या पत्नीसोबत थायलंडला गेला आहे. थायलंडमधील फुकेत येथे ते दोघे त्यांचा क्वालिटी टाइम घालवत आहेत. त्यामुळे त्याने थायलंडमध्ये मराठी भाषा गौरव दिन उत्साहात साजरा केला आहे. याचनिमित्ताने प्रथमेश परबच्या पत्नीने सोशल मीडियावर सुंदर पोस्ट लिहून चाहत्यांसोबत शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिने लिहिलंय, "जागतिक मराठी भाषा गौरव दिनाच्या थायलंड मधून हार्दिक शुभेच्छा... मराठी ही केवळ एक भाषा नाही, तर आपल्या अस्मितेचा, संस्कृतीचा आणि ओळखीचा एक अभिमानास्पद भाग आहे. जगाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यात असलो तरी मराठी माणसाचं हृदय मात्र नेहमीच मायभूमीकडे ओढ घेत असतं."

पुढे क्षितीजाने लिहिलंय, "परदेशात गेल्यावर सुरुवातीला सर्व काही नवीन वाटतं, संस्कृती, भाषा, खाद्यसंस्कृती आणि लोकांचे विचार. मात्र, जसे जसे दिवस जातात, तसतसे आपल्या मातृभाषेची ओढ लागते. मराठीची आठवण वेगवेगळ्या गोष्टींमधून सतत येत राहते. परदेशात जर एखादा मराठी माणूस भेटला, तर आनंदाला पारावार उरत नाही. ‘तुम्ही कुठून?’ एवढं विचारलं तरी गप्पांना सुरूवात होते आणि परदेशातही मराठीपण जिवंत वाटू लागते. परदेशात वेगळी भाषा वापरण्याची गरज असली तरी मनातल्या मनात मराठीचाच विचार सुरू असतो. एखादं इंग्रजी वाक्य बोलताना मध्येच "अहो, काय सांगू!" , "हे लोक काय बोलतात काहीच कळतं नाही!", "बघूया काय होतं" असं सहज सुटतं आणि आपण आपल्या मातृभाषेशी किती घट्ट जोडलेलो आहोत याची जाणीव होते."

चाहत्यांना केली विनंती 

"परदेशात असलो तरी मराठी भाषेत बोलताना जो आनंद मिळतो, तो कोणत्याही भाषेत मिळू शकत नाही. म्हणूनच आपण कुठेही असलो तरी आपल्या भाषेवर प्रेम करूया, तिचा आदर करूया आणि पुढच्या पिढीपर्यंत तिचं वारसाहक्कानं जतन करूया.
जय महाराष्ट्र!" अशी विनंती देखील त्यांनी चाहत्यांना केली आहे. दरम्यान, प्रथमेश-क्षितीजाच्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. 

Web Title: marathi cinema actor prathmesh parab wife kshitija ghosalkar shared post on the ocassion of marathi bhasha gaurav din 2025 netizens praised 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.