"लोकांना वाटायचं माझ्यात आणि महेशमध्ये स्पर्धा असायची पण..." सचिन पिळगावकरांनी स्पष्टच सांगितलं
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2024 13:53 IST2024-09-26T13:49:18+5:302024-09-26T13:53:23+5:30
अभिनेते सचिन पिळगावकर आणि महेश कोठारे यांनी मराठी सिनेसृष्टीचा एक काळ गाजवला.

"लोकांना वाटायचं माझ्यात आणि महेशमध्ये स्पर्धा असायची पण..." सचिन पिळगावकरांनी स्पष्टच सांगितलं
Sachin Pilgaonkar : अभिनेते सचिन पिळगावकर आणि महेश कोठारे यांनी मराठी सिनेसृष्टीचा एक काळ गाजवला. एकमेकांच्या तोडीस तोड असणाऱ्या या कलाकारांना मोठ्या पडद्यावर अभिनय करताना पाहायला मजा यायची. सचिन पिळगावकर तसेच महेश कोठारेंचे सिनेमे त्याकाळी प्रचंड गाजले. आजही मराठी कलाविश्वात या अभिनेत्यांचं नाव मोठ्या अदबीनं घेतलं जातं. अभिनयासोबतच त्यांनी दिग्दर्शन क्षेत्रातही उल्लेखनीय कामगिरी केली. पण, असं असतानाही महेश कोठारे आणि सचिन पिळगावकर यांनी एकत्र कधी काम केलं नाही. त्यांच्याबद्दल अनेकदा तर्क-वितर्क लावण्यात आले. यावर सचिन पिळगावकर यांनी भाष्य केलं आहे.
नुकतीच सचिन पिळगावकरांनी 'लोकमत फिल्मी'ला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी महेश कोठारेंबद्दल एक विधान केलं आहे. मुलाखती दरम्यान सचिन म्हणाले, "लोकांना वाटायचं की माझ्यात आणि महेशमध्ये स्पर्धा असायची. त्याच्यावर आम्ही दोघेही खूप हसायचो आणि असं म्हणायचो लोकांना वाटतंय तर वाटूदे आपल्या चित्रपटांसाठी ते गरजेचं आहे. शिवाय आमची चित्रपट बनवण्याची पद्धत वेगळी आहे".
पुढे सचिन म्हणाले, "आमच्या शैलीमध्ये एक अंतर होतं. चित्रपट बनवताना आपल्या स्वत चं काहीतरी असावं, ती चित्रपटांमध्ये दिसायची. तेव्हा त्यांचे चित्रपट मलाही आवडयचे आणि माझे चित्रपट महेश कोठारेंना आवडायचे. पण, आम्ही दोघे आपआपल्या पद्धतीने लढायचो".
मराठी सिनेसृष्टीला सुवर्णकाळ दाखवणारी दिग्गज जोडी आहे. महेश कोठारे आणि सचिन पिळगावकर. 'अशी ही बनवाबनवी', 'आत्मविश्वास', 'गंमत जंमत' अशा सिनेमांमधून सचिन पिळगावकरांनी प्रेक्षकांचं निखळ मनोरंजन केलं. तर दुसरीकडे 'झपाटलेला', 'धूमधडाका', 'थरथराट', 'पछाडलेला' अशा सिनेमांमधून महेश कोठारेंनी वेगळ्या धाटणीचे विनोदी सिनेमे दिग्दर्शित करुन स्वतःची वेगळी छाप सोडली.