VIDEO: अभिनेत्री हेमल इंगळे लवकरच अडकणार लग्नबेडीत, ग्रहमख विधी पडला पार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2024 12:07 IST2024-12-30T12:04:04+5:302024-12-30T12:07:21+5:30

मराठी कलाविश्वात लगीनघाई सुरू असल्याची पाहायला मिळते आहे.

marathi cinema actress hemal ingle will get married soon shared grahamakh vidhi video on social media | VIDEO: अभिनेत्री हेमल इंगळे लवकरच अडकणार लग्नबेडीत, ग्रहमख विधी पडला पार 

VIDEO: अभिनेत्री हेमल इंगळे लवकरच अडकणार लग्नबेडीत, ग्रहमख विधी पडला पार 

Hemal Ingle :  मराठी कलाविश्वात लगीनघाई सुरू असल्याची पाहायला मिळते आहे. यंदाच्या वर्षात बऱ्याच कलाकारांनी लग्नबंधनात अडकून नव्या आयुष्याला सुरूवात केली. आता लवकरच आणखी एक मराठी अभिनेत्री लग्न करणार आहे. ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून हेमल इंगळे (Hemal Ingle) आहे. अगदी काही दिवसांपूर्वीच हेमलचं केळवण पार पाडलं. तसेच तिची थायलंडमधील बॅचलर पार्टीची देखील चांगलीच चर्चा रंगली होती. त्यामुळे हेमल लग्नबंधनात केव्हा अडकणार याची उत्सुकता तिच्या चाहत्यांच्या मनात निर्माण झाली आहे. दरम्यान, आता अभिनेत्रीच्या घरी लग्नापूर्वीच्या विधींना सुरूवात झाल्याचं पाहायला मिळतंय. 


नुकताच हेमलच्या घरी ग्रहमख विधी पार पडला आहे. ग्रहमखसाठी अभिनेत्री पारंपरिक लूक करून तयार झाली आहे. याचा व्हिडीओ तिने सोशल मीडियावर शेअर केला आहे. निळ्या रंगाची पैठणी साडी, डोईवर मुंडावळ्या तसेच गळ्यात टेम्पल ज्वेलरी असा साजशृंगार करत तिने केला आहे. 

सोशल मीडियावर हेमलने तिच्या ग्रहमख विधीचा खास व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये तिने लिहिलंय, "मुहूर्तमेढ संपन्न! ही या नव्या प्रवासाची सुरूवात आहे. गणपती बाप्पाने मला कायमच योग्य मार्ग दाखवला आणि मला खात्री आहे की त्याच मार्गाचा अवलंब करते आहे. खरंतर हा माझ्यासाठी आणि माझ्या कुटुंबीयांसाठी एक भावनिक क्षण आहे. मुलीच्या पाठवणीवेळी सगळे का रडतात? त्या गोष्टी मला तेव्हा कळत नव्हत्या. पण, आज मला ते सगळं समजतंय कारण खरंच या गोष्टी फार सोप्या नाहीत. एका स्त्रीला नव्याने सुरूवात करण्यासाठी सगळं काही मागे सोडावं लागतं."

पुढे अभिनेत्रीने लिहिलंय, या नवीन प्रवासासासाठी मी खूप उत्सुक आहे, शिवाय घाबरले देखील आहे. पण एक कुटुंब आहे जे माझी आतूरतेने वाट पाहत आहे. हे खरंच दिलासादायक आहे. आयुष्य खूप कठीण आहे, आपल्याला जे काही पाहिजे ते सहज मिळत नाहीच. त्यासाठी संघर्ष करावा लागतो. पण ते आपल्याला मिळवता आलं पाहिजे. माझ्या आई-वडिलांनीच मला अशा संस्कारांमध्ये  वाढवलं आहे."

दरम्यान, हेमल इंगळेच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं, तर 'अशी ही आशिकी' या चित्रपटात तिने अभिनय बेर्डे  स्क्रीन शेअर केली होती. शिवाय अलिकडेच ती 'नवरा माझा नवसाचा- २' या चित्रपटात झळकली. या चित्रपटाच्या निमित्ताने अभिनेत्रीला अभिनेते सचिन पिळगांवकर, अशोक सराफ, सुप्रिया पिळगांवकर, निर्मिती सावंत, स्वप्नील जोशी यांसारख्या नावाजलेल्या, दिग्गज कलाकारांबरोबर काम करण्याची संधी मिळाली.

Web Title: marathi cinema actress hemal ingle will get married soon shared grahamakh vidhi video on social media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.