"माझ्या बाबांना खूप विचित्र पद्धतीने फसवलं गेलं..." कठीण काळाबद्दल बोलताना सोनाली कुलकर्णी भावुक
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2025 11:37 IST2025-03-23T11:35:37+5:302025-03-23T11:37:09+5:30
मराठीसह हिंदी तसेच दाक्षिणात्य सिनेसृष्टीत आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर छाप उमटवणारी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी.

"माझ्या बाबांना खूप विचित्र पद्धतीने फसवलं गेलं..." कठीण काळाबद्दल बोलताना सोनाली कुलकर्णी भावुक
Sonali Kulkarni: मराठीसह हिंदी तसेच दाक्षिणात्य सिनेसृष्टीत आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर छाप उमटवणारी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी (Sonali Kulkarni) नेहमी चर्चेत असते. तिनं साकारलेल्या प्रत्येक व्यक्तिरेखेचं प्रेक्षकांनी भरभरून कौतुक केलं. त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे गेल्या वर्षी आलेली मानवत मर्डर्स ही सीरिज होय. यामधील तिच्या अभिनयानं प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं. परंतु, सोनालीचा इथपर्यंत पोहोचण्याचा प्रवास फार काही सोपा नव्हता. असंख्य अडचणींवर मात करत तिनं हा टप्पा गाठला आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये सोनालीने तिच्या बालपणीच्या आठवणींना उजाळा देत संघर्ष काळावर भाष्य केलं आहे.
नुकतीच सोनाली कुलकर्णीने सुमन म्युझिक पॉडकास्टमध्ये हजेरी लावली. या मुलाखतीमध्ये अभिनेत्रीने तिच्या कठीण काळावर भाष्य केलं आहे. त्यादरम्यान ती म्हणाली, "माझ्या मनावर जखम आहे त्या गोष्टीची जी म्हणजे तेव्हा मी खूप लहान होते तुटक्या चपला, एक फ्रॉक, कापडी पिशवी आणि मी माझ्या बाबांचे पार्टनर होते त्यांच्या दारापाशी अशी तासन् तास उभी असायचे की ते बघतील आणि मी म्हणायचे की काका, आईने सांगितलंय की बाबांच्या पगारातले पैसे द्याल का? मी खूप लहान होते, त्यांच्या घरात चाललेले सगळे व्यवहार मला दिसत होते. ते कसे कलर टीव्ही बघतात, त्यांच्याकडे फोन आहे, फर्निचर आहे, ते ब्रेड-जॅम खातात आणि मी त्यांच्या फाटकापाशी उभी असायचे अशीच... मी नंतरही कितीतरी वेळा त्यांच्याकडे असं मागायला जायचे. कारण त्यावेळी माझ्या बाबांना वेगवेगळ्या ठिकाणी काम करायचे आणि त्यांना व्यवसायामध्ये खूप विचित्र पद्धतीने फसवलं गेलं होतं. मला ते खूप दिवस मनाला लागलेली गोष्ट आहे. माणसानी आपल्या पायावर समर्थपणे उभं असलंच पाहिजे."
पुढे अभिनेत्रीने म्हटलं, "त्यामुळे त्याकाळात माझं एक स्वप्न निर्माण झालं होतं की मी असे कष्ट करीन जेणेकरून माझ्याकडे पुरेसे पैसे असतील आणि माझे मित्र मैत्रिणीही म्हणतील की, अरे सोनाली आहे ना, मग काही काळजी नाही." असं म्हणत सोनाली कुलकर्णी हिने तिच्या लहानपणीचा हा कठीण काळ शेअर केला आहे.