"प्रत्येक ट्विट अन् पोस्टला पैसै आकारले तरच...", सोशल मीडियावर ट्रोल करणाऱ्यांना तेजस्विनी पंडितने धरलं धारेवर
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2025 15:01 IST2025-03-12T14:57:16+5:302025-03-12T15:01:17+5:30
"जेव्हा आपण एखाद्यावरती कमेंट करतो तेव्हा...", सोशल मीडियावर ट्रोल करणाऱ्यांना तेजस्विनी पंडितने सुनावलं

"प्रत्येक ट्विट अन् पोस्टला पैसै आकारले तरच...", सोशल मीडियावर ट्रोल करणाऱ्यांना तेजस्विनी पंडितने धरलं धारेवर
Tejaswini Pandit: मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे तेजस्विनी पंडित. (Tejaswini Pandit) दमदार अभिनय आणि निखळ सौंदर्याच्या जोरावर तिने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे. तेजस्विनी पंडित अनेकदा सामाजिक आणि राजकीय विषयांवर बेधडकपणे आपली भूमिका मांडताना दिसते. त्यामुळे अभिनेत्री बऱ्याचदा चर्चेत येते. नुकत्या दिलेल्या एका मुलाखतीमध्ये तेजस्विनीने सोशल मीडियावर होणाऱ्या ट्रोलिंगवर भाष्य केलं आहे. याशिवाय ट्रोलर्सना देखील तिने चांगलंच सुनावलं आहे.
अलिकडेच तेजस्विनी पंडितने 'मुक्काम पोस्ट मनोरंजन' या युट्यूब चॅनेलला मुलाखत दिली. या मुलाखतीत तिला सोशल मीडियावरील ट्रोलिंगबाबत प्रश्न विचारण्यात आला. त्याबद्दल बोलताना अभिनेत्री म्हणाली, "आजकाल लोक वाट्टेल त्या भाषेत वाटेल त्या लोकांना काहीही बोलतात. म्हणजे जेव्हा आपण एखाद्यावरती कमेंट करतो किंवा एखाद्याला काही बोलतो तेव्हा आपण कोण आहोत, हे असं स्वत: ला विचारावसं नाही वाटत का?."
पुढे तेजस्विनीने म्हटलं, " मला असं वाटतं बोलण्याची, व्यक्त होण्याची घाई लोकांमध्ये आहे. म्हणजे खरंच कधीकधी असं वाटतं प्रत्येक ट्विटला, पोस्टला पैसै आकारले पाहिजेत. तरच कुठेतरी हे सगळं थांबेल." असं म्हणत अभिनेत्रीने ट्रोलिंग करणाऱ्यांवर निशाणा साधला आहे.