IFFI मध्ये नवज्योत बांदिवडेकरचा सन्मान! 'घरत गणपती'साठी सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक पदार्पण पुरस्काराने सन्मानित
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2024 16:08 IST2024-11-29T16:08:24+5:302024-11-29T16:08:56+5:30
घरत गणपतीच्या दिग्दर्शकाचा सध्या सुरु असलेल्या प्रतिष्ठेच्या IFFI फेस्टिव्हलमध्ये सन्मान करण्यात आलाय

IFFI मध्ये नवज्योत बांदिवडेकरचा सन्मान! 'घरत गणपती'साठी सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक पदार्पण पुरस्काराने सन्मानित
यावर्षी रिलीज झालेल्या 'घरत गणपती' सिनेमाची चांगलीच चर्चा झाली. माऊथ पब्लिसिटीच्या जोरावर सिनेमा लोकांच्या पसंंतीस उतरला. ५५ व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (IFFI 2024) ‘भारतीय फिचर चित्रपट पुरस्कार’ विभागात ‘घरत गणपती’ या मराठी चित्रपटासाठी दिग्दर्शक नवज्योत बांदिवडेकर यांना पदार्पणातील सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार देण्यात आला. प्रमाणपत्र आणि पाच लाख रुपये रोख, असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
‘पहिल्याच चित्रपटाला मिळालेला प्रेक्षकांचा प्रतिसाद व पुरस्काराची पोचपावती भारावणारी असल्याची प्रतिक्रिया दिग्दर्शक नवज्योत बांदिवडेकर यांनी व्यक्त केली. एक छान कौटुंबिक कथा व भारतीय संस्कृतीचे दर्शन ‘घरत गणपती’ चित्रपटाच्या माध्यमातून आम्ही दाखविले, त्या चित्रपटाचं आज विविध स्तरावर खूप कौतुक होताना दिसतंय’, याचा अभिमान असल्याचंही दिग्दर्शक नवज्योत बांदिवडेकर सांगतात.
गोव्यात संपन्न झालेल्या यंदाच्या इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल ऑफ इंडियामध्ये (इफ्फी)भारतीय फिचर चित्रपट पुरस्काराच्या यादीत पहिल्यांदाच सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकीय पदार्पण हा विभाग जाहीर करण्यात आला. या पुरस्कारासाठी सात चित्रपट स्पर्धेत होते. पुरस्काराच्या या स्पर्धेत ‘ घरत गणपती’ चित्रपटाने आपली मोहोर उमटवली. 'घरत गणपती' सिनेमात भूषण प्रधान, निकिता दत्ता, शुभांगी गोखले, अश्विनी भावे, अजिंक्य देव, संजय मोने या कलाकारांनी प्रमुख भूमिका साकारल्या.