‘या प्रवासात तो नसता तर...’, केदार शिंदे यांची खास माणसासाठी खास पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2022 11:10 AM2022-04-19T11:10:54+5:302022-04-19T11:11:13+5:30

Kedar Shinde Post : मराठी सिनेइंडस्ट्रीतील दिग्गज अभिनेते, दिग्दर्शक आणि निमार्ते केदार शिंदे  सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय आहेत. सध्या त्यांची एक खास पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतेय.

marathi filmmaker kedar shinde post for veteran actor jayraj nair | ‘या प्रवासात तो नसता तर...’, केदार शिंदे यांची खास माणसासाठी खास पोस्ट

‘या प्रवासात तो नसता तर...’, केदार शिंदे यांची खास माणसासाठी खास पोस्ट

googlenewsNext

मराठी सिनेइंडस्ट्रीतील दिग्गज अभिनेते, दिग्दर्शक आणि निर्माते केदार शिंदे  (Kedar Shinde) सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय आहेत. त्यांच्या सोशल मीडिया पोस्ट क्षणात व्हायरल होतात. सध्या त्यांची अशीच एक खास पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतेय. होय, मराठीतील ज्येष्ठ अभिनेते जयराज नायर (Jayraj Nair) यांच्यासाठी केदार शिंदे यांनी खास पोस्ट शेअर केली आहे.

नुकताच जयराज यांचा वाढदिवस झाला. हे निमित्त साधून केदार शिंदे यांनी जयराज यांच्याबद्दल भरभरून लिहिलं आहे. या प्रवासात तो नसता तर आम्ही इथवर नक्कीच पोहोचलो नसतो..., अशा शब्दांत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
जयराज नायर यांनी ‘सही रे सही’मधील दत्तू बेवडा हे पात्र साकारलं होतं. शाहीर साबळे यांच्या ‘महाराष्ट्राची लोकधारा मधून’ जयराज नायर यांनी सिनेसृष्टीत पदार्पण केलं.

 वाचा, केदार शिंदे यांची पोस्ट त्यांच्याच शब्दांत...

जयराज नायर.. हा एक मराठी माणूस आहे. तसा तो केरळचा! पण मी त्याला भेटलो तेव्हा मी ३ वर्षांचा असेन. शाहीर साबळे आणि पार्टी मध्ये हौशी कलाकार म्हणून त्याची एन्ट्री झाली. पुढे प्रत्येक बाबांच्या मुक्तनाट्यात त्याचा सहभाग होता. ठाण्याच्या गरवारे कंपनीची नोकरी सांभाळून तो त्याचा कलेचा प्रवास करत होता. माझं कळतं वय झालं तोवर तो आमच्या घराचा मेंबर झाला होता. मी जयराज मामा म्हणतो त्याला. अजुनही!

पुढे आम्ही महाराष्ट्राची लोकधारा मधे सहभागी झालो तेव्हा तो आम्हाला सांभाळून घ्यायला होता. तो केरळचा असूनही अस्खलित मराठी बोलतो याचं अप्रूप वाटायचं. पण कालांतराने तो मामा म्हणूनच जवळचा झाला आणि आडनाव मिटलच... आम्ही लोकधारा करतानाच एकांकिका करण्याच्या भुताने आम्हाला झपाटलं. आमची धडपड पाहून त्याने सुध्दा आमच्यात सामील व्हायची इच्छा व्यक्त केली. खरतर वयाने तो खुप मोठा तरीही कुठलाही आडपडदा न ठेवता तो आमच्या गॅंग मधे सहभागी झाला. हळूहळू मी व्यावसायिक रंगभूमीवर धडपड करत असतानाच त्याची कंपनी सुटली. गरवारे बंद झाली आणि तो हतबल झाला. त्याची दोन मुलं तेव्हा शाळेत होती. त्यावेळी मी श्रीमंत दामोदर पंत नाटक लिहीत होतो. त्याने भुमिका करण्याची इच्छा व्यक्त केली पण त्यात त्याला साजेसा रोल नव्हताच. श्रुंगारपुरे हे कॅरेक्टर एका सीन साठी येत होतं. त्याला त्यासाठी कसं विचारायचं? पण त्याने मोठेपणाने ती भुमिका स्वीकारली. आजही घराघरात तो त्याच कॅरेक्टरच्या नावाने प्रसिद्ध आहे.

सही रे सही करताना दत्तू बेवडा हे कॅरेक्टर मी खास जयराज मामासाठी लिहीलं. ते त्याने इमानदारीने सादर केलं. अगदी २२ वर्ष न थकता न कंटाळता तो भरत सोबत उभा आहे. आमच्या डोळ्यासमोर त्याची आणि विजय चव्हाण यांची दोस्ती आहे.

आज जयराज मामा तृप्त आहे. समाधानी आहे. तो आणि मामी यांनी आपल्या मुलांना शिकवलं. वाढवलं. संस्कार दिले. आज दोन्ही मुलं परदेशात सेटलआहेत. आणि जयराज मामा रिटायर्ड न होता त्याचा कलेचा प्रवास करत आहे. हा जो फोटो आहे, तो खास आम्ही तिघांनी त्याला विनंती करून काढला आहे. कारण आमच्या या प्रवासात तो नसता तर आम्ही इथवर नक्कीच पोहोचलो नसतो....

 

Web Title: marathi filmmaker kedar shinde post for veteran actor jayraj nair

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.