Chandramukhi Trailer : ढोलकीचा ताल, घुंगरांचे बोल आणि दिलखेचक अदा...; पाहा, ‘चंद्रमुखी’चा अप्रतिम ट्रेलर
By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2022 11:36 AM2022-04-21T11:36:20+5:302022-04-21T11:37:13+5:30
Marathi Movie Chandramukhi Official Trailer : चंद्रा आणि दौलतराव देशमाने यांची निर्मळ प्रेमकथा जाणून घेण्याविषयी प्रेक्षक उत्सुक असतानाच आता 'चंद्रमुखी' चित्रपटाचा ट्रेलर सोशल मीडियावर प्रदर्शित झाला आहे.
Marathi Movie Chandramukhi Official Trailer : अभिनेता व दिग्दर्शक प्रसाद ओक ( Prasad Oak) याने आत्तापर्यंत रसिकांना अनेक चांगले चित्रपट दिलेत. कच्चा लिंबू, हिरकणी हे त्याचे दोन सिनेमे तर खूप गाजलेत. सध्या प्रसाद ओकच्या ‘चंद्रमुखी’ (Chandramukhi ) या सिनेमाची जोरदार चर्चा आहे. येत्या 29 तारखेला प्रसादची ही राजकीय रशिली प्रेमकहाणी प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. अमृता खानविलकर (Amruta Khanvilkar)आणि आदिनाथ कोठारे (Addinath Kothare) यांच्या अप्रतिम अभिनयानं सजलेल्या या सिनेमाची प्रेक्षक आतुरतेने प्रतीक्षा करत आहेत. तूर्तास या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झालाये आणि सध्या या ट्रेलरवर चाहत्यांच्या अक्षरश: उड्या पडत आहेत.
ट्रेलरची सुरूवात होते ती आदिनाथच्या एका संवादाने आणि हा पहिलाच संवाद खल्लास करतो. माणूस पावसाचं पाणी साठवायला शिकला. पण पाऊस जर शब्दसुरांच्या चांदण्यांचा असेल तर तो कुठे आणि कसा साठवावा? असा संवाद हृदयाला भिडतो. पाठोपाठ अमृताच्या बहारदार लावणीची झलक दिसते. यानंतर अमृता आणि आदिनाथ यांच्यावर चित्रीत अनेक रोमॅन्टिक सीन्सची झलकही पाहायला मिळते. हा ट्रेलर सुरूवातीपासून शेवटपर्यंत अक्षरश: खिळवून ठेवतो. विशेषत: ट्रेलरमधील कलाकारांच्या तोंडचे संवाद मनाला आरपार भिडतात. ट्रेलरमध्ये एक नवी व्यक्तिरेखा समोर येते, ती म्हणजे सौभाग्यवती दमयंती दौलतराव देशमाने हिची. ही भूमिका मृण्मयी देशपांडे साकारणार असून हा प्रेमाचा त्रिकोण असल्याचा ट्रेलरवरून अंदाज येतोय. चंद्रआणि दौलतराव यांच्या हळुवार खुलत जाणाऱ्या प्रेमकहाणीत दमयंतीच्या येण्याने नाट्यमय ट्विस्ट येणार का, की त्यांची प्रेमकहाणी अशीच अबाधित राहणार, याचे उत्तर आपल्याला 29 एप्रिल रोजी चित्रपटगृहात मिळणार आहे.
‘चंद्रमुखी’चा ट्रेलर सोशल मीडियावर प्रचंड गाजतोय. अगदी पहिल्या दहा मिनिटांतच हा ट्रेलर 2 हजारांवर लोकांनी पाहिला. शेकडो लोकांनी लाईक केला.
अमृताने तिच्य इन्स्टा अकाऊंटवर ट्रेलर शेअर केला आहे. ‘चंद्रमुखी उमाजीराव जुन्नरकर आपके सामने हाजीर है... ह्या तमाशाचा येक फूल यांड फायनल खेळ सादर करायला. एका कलावंतीणिचा श्रृंगार लेऊन उभि हाय हि चंद्रा.आता काय रंगायचाय तो तमाशाचा फड हितचं रंगू द्या...,’असं ट्रेलर शेअर करताना तिने लिहिलं आहे.
‘चंद्रमुखी’ हा सिनेमा विश्वास पाटलांच्या कादंबरीवर आधारित आहे. अजय अतुलने या चित्रपटाला संगीत दिलं आहे. मराठी सिनेसृष्टीला 'कच्चा लिंबू', 'हिरकणी' यांसारखे सुपरहिट चित्रपट दिल्यानंतर आता दिग्दर्शक प्रसाद ओक आणि लेखक चिन्मय मांडलेकर यांची जबरदस्त जोडी 'चंद्रमुखी' सारख्या भव्यदिव्य चित्रपटाच्या निमित्ताने हॅट्रिक करत आहे. अक्षय बर्दापूरकर, प्लॅनेट मराठी आणि गोल्डन रेशो फिल्म्स निर्मित, क्रिएटिव्ह वाईब प्रॉडक्शन प्रस्तुत फ्लाइंग ड्रॅगन एंटरटेनमेंट, येलस्टार फिल्म्स, लाइटविदिन एंटरटेनमेंट सहप्रस्तुत 'चंद्रमुखी' या चित्रपटाची पटकथा आणि संवाद चिन्मय मांडलेकर यांचे आहेत. या चित्रपटात अमृता खानविलकर, आदिनाथ कोठारे, मृण्मयी देशपांडे यांच्यासोबतच मोहन आगाशे, राजेंद्र शिसतकर, समीर चौघुले, नेहा दंडाळे, सुरभी भावे, राधा सागर यांच्याही प्रमुख भूमिका आहेत.