'साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट' सांगणारा 'धर्मवीर २' OTT वर रिलीज! या ठिकाणी घरबसल्या पाहू शकता
By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2024 12:01 PM2024-10-26T12:01:08+5:302024-10-26T12:01:52+5:30
यावर्षी गाजलेला मराठी सिनेमा 'धर्मवीर २' आता ओटीटीवर रिलीज झालाय. जाणून घ्या सविस्तर (dharmaveer 2)
‘धर्मवीर 2’ सिनेमाची चांगलीच चर्चा झाली. हा सिनेमा प्रेक्षकांनाही खूप आवडला. प्रसाद ओक आणि क्षितिश दाते यांनी अनुक्रमे आनंद दिघे आणि एकनाथ शिंदे यांची गोष्ट आपल्या दमदार अभिनयातून जिवंत केली. क्षितिशने ‘धर्मवीर 2’मध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जी भूमिका साकारली त्याचं खूप कौतुक झालं. प्रवीण तरडे यांचे दिग्दर्शन आणि झी स्टुडिओ व साहिल मोशन आर्ट्स यांची निर्मिती असलेला ‘धर्मवीर 2’ सिनेमा आता ओटीटीवर रिलीज झालाय.
या ओटीटीवर ‘धर्मवीर 2’ झालाय रिलीज
‘धर्मवीर 2’ची गोष्ट पहिल्या सिनेमाच्या शेवटापासून पुढे सुरू होते. त्यामध्ये कोणत्या प्रमुख घटकांमुळे एकनाथ शिंदे २०२२ मध्ये शिवसेनेतून बाहेर पडले होते ते दाखवण्यात आलं होतं. या सिनेमात राजकीय निष्ठा आणि महत्त्वाकांक्षेची आव्हानं, दिघे यांचे वारसदार या नात्याने शिंदे यांचा प्रवास आणि राजकीय पटलावरील आव्हानांतून मार्ग काढताना आलेली आव्हानं पाहायला मिळतं. आता ‘धर्मवीर 2’ २५ ऑक्टोबरपासून ZEE5 या ओटीटीवर रिलीज केला गेलाय. त्यामुळे प्रेक्षकांना घरबसल्या ZEE5 वर 'धर्मवीर 2' पाहता येईल.
‘धर्मवीर 2’ विषयी
'धर्मवीर २' सिनेमात प्रसाद ओकने आनंद दिघे यांची भूमिका साकारली आहे. या सिनेमातून आनंद दिघेंच्या हिंदुत्वाची गोष्ट प्रेक्षकांना पाहायला मिळाली. प्रविण तरडेंनी या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. या सिनेमात प्रसाद ओकबरोबर क्षितीश दाते, स्नेहल तरडे, आनंद इंगळे, सुनिल तावडे हे कलाकारही महत्त्वाच्या भूमिकेत दिसले. पहिल्या भागाप्रमाणे दुसऱ्या भागालाही प्रेक्षकांंचं चांगलं प्रेम मिळालं. आता सिनेमा ओटीटीवर रिलीज झाल्याने महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातील लोकांपर्यंत सिनेमा पोहचेल यात शंका नाही.