Video: घोड्यावरुन आली अजिंक्यची स्वारी! शिवानी सुर्वेच्या लग्नात 'झिम्मा 2'च्या कलाकारांची हजेरी
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2024 16:37 IST2024-02-01T16:23:35+5:302024-02-01T16:37:35+5:30
सुहास जोशी, हेमंत ढोमे, सायली संजीवला पाहून खूश झाली शिवानी

Video: घोड्यावरुन आली अजिंक्यची स्वारी! शिवानी सुर्वेच्या लग्नात 'झिम्मा 2'च्या कलाकारांची हजेरी
मराठी अभिनेत्री शिवानी सुर्वे (Shivani Surve) आज विवाहबद्ध झाली आहे. बॉयफ्रेंड आणि अभिनेता अजिंक्य ननावरेसह (Ajinkya Nanaware) तिने लग्न केले. कालच या सेलिब्रिटी कपलचा थाटात साखरपुडा पार पडला. तर आज सकाळीच हळद समारंभ झाला आणि दुपारी ही जोडी लग्नबंधनात अडकली. ठाण्यातील येऊरमधील एका रिसॉर्टमध्ये हा विवाहसोहळा आयोजित करण्यात आला होता.
अभिनेत्री शिवानीचे लग्नात दोन लूक पाहायला मिळाले. आधी तिने विधींसाठी पारंपरिक लाल-पिवळ्या रंगाची साडी नेसली. तर सातफेरे घेताना तिने गुलाबी रंगाचा लेहेंगा घातला ज्यामध्ये ती कमालीची सुंदर दिसत आहे. तर अजिंक्यनेही पांढऱ्या आणि गुलाबी थीमला पसंती दिली. दोघांनी एकमेकांच्या गळ्यात हार घातला तो क्षणही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. त्यांच्या लग्नाची मराठी सिनेसृष्टीत जोरदार चर्चा रंगली आहे. त्यांचे फोटो, व्हिडिओही व्हायरल होत आहेत. शिवानीचा 'झिम्मा 2' सिनेमा सुपरहिट झाला. या सिनेमाच्या स्टारकास्टनेही तिच्या लग्नात आवर्जुन हजेरी लावली. ज्येष्ठ अभिनेत्री सुहास जोशी, दिग्दर्शक हेमंत ढोमे, अभिनेत्री सायली संजीव या विवाहस्थळी दिसल्या. अजिंक्य घोड्यावरुन आल्याचा व्हिडिओही कॅमेऱ्यात कैद झाला. अगदी आनंदाच्या वातावरणात हा विवाहसोहळा पार पडला. 'लोकमत फिल्मी'च्या इन्स्टाग्राम पेजवर विवाहसोहळ्याचे व्हिडिओ अपलोड करण्यात आले आहेत.
शिवानी आणि अजिंक्यचं विवाहस्थळही खूप सुंदर दिसत आहे. येईरच्या एक्झॉटिक रिसॉर्टमध्ये ते लग्नबंधनात अडकले. फुलांनी सजलेला मंडप, सुंदर नैसर्गिक परिसरात हा विवाहसोहळा पार पडला. दोघांनाही कलाकार आणि चाहत्यांनी भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
शिवानी आणि अजिंक्य ननावरेची लव्हस्टोरी खूपच हटके आहे. तू जीवाला गुंतवावे या मालिकेत काम करत असताना त्यांची मैत्री झाली. मालिका संपल्यानंतर त्यांच्या भेटीगाठी वाढल्या. २०१५-१६ च्या दरम्यान त्यांच्या रिलेशनशिपला सुरूवात झाली. त्यानंतर वर्षभराने म्हणजेच साधारण २०१७ मध्ये त्यांनी त्यांच्या नात्याबद्दल घरी सांगितले. मात्र दोघांच्या घरातून नात्याला ठळक विरोध झाला होता. त्यांच्या घरच्यांनी दोघांना एकत्र राहून दाखवा असं सांगितले. शिवानी आणि अजिंक्य लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये राहू लागले. लॉकडाऊन सुरू झाल्यावर त्यांच्या घरच्यांना त्यांच्या नात्यावर विश्वास बसला आणि ४ वर्षांनंतर त्यांच्या घरच्यांनी या नात्याला परवानगी दिली. ३१ जानेवारीला साखरपुडा आणि १ फेब्रुवारीला त्यांनी लग्न केले.