मल्याळम चित्रपट 'अंगमाली डायरीज'चा मराठी रिमेक लवकरच, अवधुत गुप्तेने केली घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2018 02:49 PM2018-08-10T14:49:48+5:302018-08-10T14:53:06+5:30
'कोल्हापूर डायरीज' चित्रपटाची टीम शेवटच्या शेड्युलचे कोल्हापूरमध्ये चित्रीकरण करत आहेत.
गेल्या वर्षी प्रदर्शित अंगमाली डायरीज हा मल्याळम चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटाला साऊथमध्ये खूप चांगला प्रतिसाद मिळाला. या चित्रपटाने वीस कोटींहून अधिक गल्ला जमविला होता. आता या चित्रपटाचा मराठीत रिमेक येत असून या चित्रपटाचे नाव 'कोल्हापूर डायरीज' असे आहे. या चित्रपटाची घोषणा गायक अवधूत गुप्तेने सोशल मीडियावर दिली आहे. तसेच चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी या चित्रपटाबाबतची काही माहिती ट्विटरवर दिली आहे.
तरण आदर्श यांनी ट्विट केले की, अवधूत गुप्ते व वजीर सिंग 'कोल्हापूर डायरीज' या चित्रपटासाठी एकत्र आले आहेत. या सिनेमाचे दिग्दर्शन जो राजन करत आहेत. हा अनेक पुरस्कारांवर मोहोर उमटविणाऱ्या यशस्वी मल्याळम चित्रपट 'अंगमाली डायरीज'चा रिमेक आहे. कोल्हापूर डायरीज चित्रपटाची टीम अखेरचे कोल्हापूरमधील चित्रीकरण करीत आहेत.
Avadhoot Gupte and Vajir Singh team up to curate #KolhapurDiaries in Marathi... Directed by Joe Rajan... #KolhapurDiaries is the remake of award winning, hugely successful Malayalam film #AngamalyDiaries...
— taran adarsh (@taran_adarsh) August 10, 2018
Team in Kolhapur from today for the final schedule. pic.twitter.com/O38YBso91f
अवधूत गुप्तेने तरण आदर्श यांचे ट्विट सोशल मीडियावर शेअर करून लिहिले की, जय कोल्हापूर! मित्रांनो... यंदाच्या वर्षी एका धमाक्यासाठी तयार रहा.
अंगमाली डायरीज चित्रपट क्राईम ड्रामावर आधारीत आहे. यात अंगमाली या ठिकाणी राहणाऱ्या विन्सेन्ट पेपे या युवकाची कथा रेखाटण्यात आली आहे. तो एका घटनेमुळे गुन्हेगारी जगात सामील होतो आणि मग, त्याला कोणकोणत्या गोष्टींचा सामना करावा लागतो, हे यात दाखवण्यात आले आहे.
अंगमाली डायरीज या चित्रपटाचा मराठी रिमेक 'कोल्हापूर डायरीज' चित्रपटाची कथा ही कोल्हापूरमध्ये घडलेली दाखवण्यात आली असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या चित्रपटात कोण कोण कलाकार आणि कथा काय असणार हे जाणून घेणे औत्सुकतेचे ठरणार आहे.