कौतुकस्पाद ! मराठी सिनेइंडस्ट्रीतील अभिनेत्री संस्कृती बालगुडेने पटाकवले तब्बल चार पुरस्कार, जाणून घ्या याबाबत
By ऑनलाइन लोकमत | Published: March 2, 2022 05:37 PM2022-03-02T17:37:11+5:302022-03-02T17:41:47+5:30
अनेक सिनेमे न स्वीकारता सिलेक्टिव्ह राहायला संस्कृतीला आवडते. आता अभिनेत्री संस्कृती बालगुडेला तिच्या अभिनयासाठी कौतुकाची थाप मिळतेय.
कोणत्याही भूमिकेला योग्य न्याय देण्याचं कसब अभिनेत्री संस्कृती बालगुडेकडे आहे. तिने आजवर बऱ्याच अवघड भूमिकाही अगदी सोप्या पद्धतीने सादर करीत रसिकांची मनं जिंकली आहेत. अनेक सिनेमे न स्वीकारता सिलेक्टिव्ह राहायला संस्कृतीला आवडते. आता अभिनेत्री संस्कृती बालगुडेला तिच्या अभिनयासाठी कौतुकाची थाप मिळतेय. ‘८ दोन ७५’ ह्या चित्रपटातल्या तिच्या उत्कृष्ठ अभिनयासाठी तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होतोय. गेल्या काही दिवसांमध्ये वेगवेगळ्या फिल्म फेस्टिवलमध्ये दाखवल्या गेलेल्या ह्या चित्रपटाने संस्कृती बालगुडे एका चांगली अभिनेत्री आहे हे सिद्ध झाले आहे.
इंडो फ्रेंच इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये सर्वोत्कृष्ठ अभिनेत्री, ड्रुक इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्री, गंगटोक इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलमध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्री आणि बिरसामुंडा इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलमध्ये सर्वोत्कृष्ठ सहायक अभिनेत्री अशा चार निरनिराळ्या फिल्म फेस्टिवलमध्ये चार पुरस्कारांनी तिला भुषवण्यात आलंय.
अभिनेत्री संस्कृती बालगुडे ह्याविषयी प्रतिक्रिया देताना म्हणते, “जगभरातल्या आंतरराष्ट्रीय फिल्मफेस्टिवलमध्ये आमच्या सिनेमाला 65 हून अधिक पुरस्कार मिळालेत. गेली दोन वर्ष सिनेमाविश्व थांबलं होतं आणि ते सुरू झाल्यानंतरची ही अत्यंत गोड बातमी आहे. सिनेमाचा विषय वेगळा आहे. आणि त्याचं जे कौतुक होतंय, त्यानेच मी खूप भारावून गेले होते. मला वैयक्तिक पुरस्कारांची अपेक्षा नव्हती. पण सिनेमाचाच फक्त गौरव होत नाही आहे तर मलाही चार आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळणं ही खूप भारी गोष्ट आहे. हे अविश्वसनीय आहे. माझे हे पहिले-वहिले आंतरराष्ट्रीय पुरस्कार आहेत.”