आधी पेट्रोल पंप आता ज्यूस सेंटर; आदर्श शिंदेने सुरु केला नवा व्यवसाय? म्हणाला...
By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2024 07:16 PM2024-02-16T19:16:13+5:302024-02-16T19:18:51+5:30
मराठी कलाविश्वातील शिंदे फॅमिली हे लोकप्रिय कुटुंब आहे. आपल्या सुमधूर आवाजाने ते प्रेक्षकांचं पुरेपूर मनोरंजन करतात. आनंद शिंदेंची लोकगीते ...
मराठी कलाविश्वातील शिंदे फॅमिली हे लोकप्रिय कुटुंब आहे. आपल्या सुमधूर आवाजाने ते प्रेक्षकांचं पुरेपूर मनोरंजन करतात. आनंद शिंदेंची लोकगीते आजही प्रत्येक कार्यक्रमात वाजवली जातात. घरातच गायनाचं बाळकडू मिळाल्याने पुढे आदर्श शिंदेनेही वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत कलाविश्वात नाव कमावलं. वडिलांप्रमाणेच आदर्शही लोकप्रिय गायक आहे. यासोबतच आदर्श शिंदे हा सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असतो. आता त्याच्या एका नव्य पोस्टने सर्वांचे लक्ष वेधलं आहे.
गेल्याच वर्षी आदर्श शिंदेने व्यवसाय क्षेत्रात पाऊल ठेवले. त्याने पंढरपूर येथील वेळापूरमध्ये स्वतःचा पेट्रोलपंप सुरु केला होता. आता पेट्रोल पंपानंतर आदर्श शिंदेने स्वत:चे ज्यूस सेंटर सुरु केले काय अशी चर्चा सुरू आहे. याला कारण ठरला आहे एक फोटो. जो आदर्शने त्याच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या फोटोमध्ये तो रस्त्याच्या बाजूला असणाऱ्या एका ज्यूस सेंटरजवळ उभा असल्याचं दिसून येत आहे. या ज्यूस सेंटरचे नाव 'आदर्श लेमन ज्यूस' असे आहे.
आदर्शने फोटोसोबत दिलेल्या कॅप्शनमध्ये लिहिले, 'नवीन बिझनेस सुरू केला आहे असं समजू नका, हा खूप जुना फोटो आहे. महाबळेश्वरला फिरायला गेलो होतो, तेव्हा माझ्या नावाचा हा ज्यूस सेंटर दिसला. मग काय, ज्यूस तर घ्यायलाच हवा. त्यामुळे ज्यूसपण घेतला आणि फोटोपण काढला'. त्याच्या या पोस्टवर चाहते विविध कमेंट करत आहेत.
आदर्श शिंदे हा मराठी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय गायक आहे. वयाच्या 10 व्या वर्षापासून त्याने गाणं शिकण्यास सुरुवात केली. सुरेश वाडकर यांच्याकडून त्याने शास्त्रीय संगीतातील धडे घेतले आहेत. आदर्श शिंदेने आजवर मराठी आणि हिंदी अशा दोन भाषांमधील 1500 हून अधिक गाणी गायली आहेत. आदर्श शिंदे यांच्या गाण्यांचे आपण सर्वच जणं फॅन्स आहोत. त्यामुळे त्याची जोरात चर्चा असते. नुकतेच त्याचं '८ दोन ७५ : फक्त इच्छाशक्ती हवी!' या सिनेमातील 'एन्जॉय एन्जॉय' हे धमाल गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे.