"'ॲनिमल'च्या जगात मला...", 'झिम्मा २' पाहिल्यानंतर मराठी गायकाने रणबीर आणि सिद्धार्थच्या भूमिकेची केली तुलना
By ऑनलाइन लोकमत | Published: December 7, 2023 02:15 PM2023-12-07T14:15:35+5:302023-12-07T14:15:52+5:30
'झिम्मा २'बरोबरच रणबीर कपूर मुख्य भूमिकेत असलेल्या 'ॲनिमल' चित्रपटाचीही जोरदार चर्चा आहे. 'झिम्मा २' मधील कबीर या पात्राची तुलना रोहितने 'ॲनिमल'बरोबर केली आहे.
अनेक बॉलिवूड सिनेमांना टक्कर देत 'झिम्मा २' हा मराठी चित्रपट बॉक्स ऑफिस गाजवत आहे. हेमंत ढोमेचं दिग्दर्शन असलेल्या झिम्मा २ने प्रेक्षकांना भुरळ घातली आहे. जिकडेतिकडे 'झिम्मा २'च्या शोचे हाऊसफुल बोर्ड लागत आहेत. सात महिल्यांच्या रियुनियनची गोष्ट सांगणाऱ्या या चित्रपटाने महिला प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे. या सिनेमाच्या स्क्रिनिंगदरम्यानचे व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. प्रेक्षकांबरोबर अनेक मराठी कलाकारही 'झिम्मा २'चं कौतुक करत आहेत.
प्रसिद्ध मराठी गायकानेही 'झिम्मा २'साठी खास पोस्ट केली आहे. आपल्या सुमधूर आवाजाने प्रेक्षकांची मनं जिंकणाऱ्या रोहित राऊतने नुकताच 'झिम्मा २' सिनेमा पाहिला. त्यानंतर रोहितने इन्स्टाग्रामवर एक स्टोरी शेअर केली आहे. 'झिम्मा २'बरोबरच रणबीर कपूर मुख्य भूमिकेत असलेल्या 'ॲनिमल' चित्रपटाचीही जोरदार चर्चा आहे. बॉक्स ऑफिसवर 'ॲनिमल'ने धुमाकूळ घातला आहे. या सिनेमातील रणबीरने साकारलेल्या भूमिकेचं सर्वत्र कौतुक होत आहे. 'झिम्मा २' मधील कबीर या पात्राची तुलना रोहितने 'ॲनिमल'बरोबर केली आहे.
"'ॲनिमल'च्या या जगात मला कबीर व्हायला आवडेल," असं रोहितने इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये म्हटलं आहे. याबरोबरच 'झिम्मा २' पाहण्यासाठी त्याने प्रेक्षकांना आवाहनही केलं आहे. या पोस्टमध्ये त्याने सिद्धार्थ चांदेकर आणि हेमंत ढोमेला टॅगही केलं आहे. रोहित राऊतने 'झिम्मा २'साठी केलेली पोस्ट चर्चेत आली आहे.
२०२१मध्ये प्रदर्शित झालेल्या 'झिम्मा'चा 'झिम्मा २' सिक्वल आहे. या सिनेमात रिंकू राजगुरू, शिवानी सुर्वे, सायली संजीव, क्षिती जोग, सुचित्रा बांदेकर, निर्मिती सावंत, सुहास जोशी आणि सिद्धार्थ चांदेकर मुख्य भूमिकेत आहेत.