अखेर 'बॉईज ३' मधील ‘तिचा’ चेहरा आला समोर; छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्रीचं रुपेरी पडद्यावर पदार्पण
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2022 15:38 IST2022-08-04T15:36:45+5:302022-08-04T15:38:15+5:30
Vidula Chougule: ‘बॅाईज ३’च्या घोषणेपासूनच धैऱ्या, ढुंग्या आणि कबीर यांच्यासोबत राडा घालायला कोण अभिनेत्री असणार, याची सर्वत्र चर्चा सुरु होती.

अखेर 'बॉईज ३' मधील ‘तिचा’ चेहरा आला समोर; छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्रीचं रुपेरी पडद्यावर पदार्पण
'बॉईज' आणि 'बॉईज २' हे दोन्ही चित्रपट बॉक्स ऑफिसवर तुफान गाजले. या चित्रपटातील धैऱ्या, ढुंग्या आणि कबीर या त्रिकुटाने प्रेक्षकांच्या मनावर वेगळीच छाप उमटवली. त्यामुळे या चित्रपटाच्या पुढील भागाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहात आहेत. आतापर्यंत बॉईज ३ (boys 3) चित्रपटाचे अनेक पोस्टर प्रदर्शित झाले. परंतु, यातील एक पोस्टर नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेत होता. या पोस्टरमध्ये धैऱ्या,ढुंग्या आणि कबीर यांच्यासोबत एक मुलगी पाहायला मिळाली. परंतु, ही मुलगी नेमकी कोण हे मात्र, गुलदस्त्यात ठेवण्यात आलं होतं. अखेर या तरुणीच्या भूमिकेवरील पडदा दूर झाला असून ही भूमिका कोणती अभिनेत्री साकारणार हेदेखील समोर आलं आहे.
'बॉईज' आणि 'बॉईज २' या दोन्ही चित्रपटांमध्ये धैऱ्या, ढुंग्या आणि कबीरच्या आयुष्यातील येणारी मुलगी हा एक वेगळाच विषय ठरला. प्रत्येक वेळी यात हॅण्डसम कबीरनेच बाजी मारली. त्यामुळे ‘बॅाईज ३’च्या घोषणेपासूनच धैऱ्या, ढुंग्या आणि कबीर यांच्यासोबत राडा घालायला कोण अभिनेत्री असणार, याची सर्वत्र चर्चा सुरु होती. अखेर ‘ती’चा चेहरा समोर आला आहे. विशेष म्हणजे या चित्रपटाच्या निमित्ताने छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री सिनेसृष्टीत पदार्पण करत आहे.
छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री विदुला चौगुले (Vidula Chougule) बॉईज ३ या चित्रपटात झळकणार असून पोस्टरवर झळकलेली ही मुलगी विदुला असल्याचं समोर आलं आहे. परंतु, विदुला या चित्रपटात नेमकी कोणती भूमिका साकारणार हे अद्यापही गुलदस्त्यात ठेवण्यात आलं आहे. मात्र, तिच्या येण्यामुळे धैऱ्या, ढुंग्या आणि कबीरच्या आयुष्यात उलथापालथ होणार हे नक्की.
दरम्यान, बॉईज ३ हा चित्रपट येत्या१६ सप्टेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सुप्रीम मोशन पिक्चर्स प्रा. लि प्रोडक्शन अंतर्गत एव्हरेस्ट एंटरटेनमेंटसह अवधूत गुप्ते प्रस्तुत 'बॉईज ३' चे दिग्दर्शन विशाल सखाराम देवरुखकर यांनी केलं आहे. तर, लालासाहेब शिंदे, राजेंद्र शिंदे, संजय छाब्रिया यांनी निर्मितीची धुरा सांभाळली आहे.