सिनेसृष्टीतले बहुगुणी सालस व्यक्तिमत्व हरपले; सुधीर मुनगंटीवारांनी सीमा देव यांना वाहिली आदरांजली
By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2023 12:37 PM2023-08-24T12:37:08+5:302023-08-24T12:39:55+5:30
ज्येष्ठ अभिनेत्री सीमा देव यांच्या निधनाबद्दल व्यक्त केल्या शोकसंवेदना
Seema Dev Passes away: सीमा देव यांच्या निधनाने भारतीय सिनेसृष्टीतले एक सालस व्यक्तिमत्व हरपले आहे, अशा शब्दात राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी अभिनेत्री सीमा देव यांना श्रद्धांजली वाहिली आहे. ते पुढे म्हणाले की, पाश्चात्य संस्कृतीच्या प्रभावाच्या काळात चित्रपट सृष्टीसारख्या क्षेत्रात अतिशय उच्च स्थान निर्माण करतांना आणि आयुष्यभर ते स्थान कायम राखतांनाही स्वतःवरील आणि आपल्या कुटुंबावरील भारतीय संस्कार जतन करणाऱ्या सीमाताई भारतीय समाजाच्या कायम लक्षात राहतील.
जन्माने मुंबईतील गिरगांवकर असलेल्या नलीनी सराफ अभिनेते रमेश देव यांच्याशी विवाह झाल्यावर सीमा देव झाल्या. त्यांच्या व्यक्तिमत्वात गिरगांवचा साधेपणा आणि सुसंस्कृत सालसपणा ठासून भरला होता. मराठी हिंदी चित्रपटसृष्टीत या दोघांनीही आपआपले स्वतंत्र स्थान निर्माण केले होते, त्यांच्या जवळपास सर्वच भूमिका अजरामर म्हणाव्यात अशा आहेत, असेही श्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.
दीर्घकाळ आपल्या अभिनयाने त्यांनी भारतीय चित्रपटसृष्टीत आपला वेगळा ठसा उमटवला. 1957 सालच्या "आलिया भोगासी" या मराठी चित्रपटाद्वारे सीमा देव यांनी चित्रपटक्षेत्रात पदार्पण केले. आनंद सारख्या चित्रपटात समोर अमिताभ बच्चन आणि राजेश खन्नांसारखे दिग्गज कलाकार असतांना केलेल्या आपल्या सहज अभिनयाने त्यांनी स्वतःचे कायमस्वरूपी स्थान हिंदी चित्रपटसृष्टीत तयार केले, असेही ते म्हणाले.
1957 मधल्या "आलीया भोगासी" पासून सुरू झालेली त्यांची सीनेसृष्टीतली कारकीर्द हिंदीतील मीयां बीबी राज़ी, सरस्वतीचंद्र, कोशीश, कश्मकश, कोरा कागज, सुनहरा संसार, नसीब अपना अपना, संसार, पासून अगदी 2010 मधल्या "जेता"पर्यंत सातत्याने गाजत राहिली. त्यांनी भूमिका साकारलेले जगाच्या पाठीवर, मोलकरीण, यंदा कर्तव्य आहे, या सुखांनो या, सुवासिनी, हा माझा मार्ग एकला हे मराठी चित्रपट विशेष गाजले. ईश्वर सीमाताईंना सद्गती देवो. या दुःखाच्या काळात मी देव परिवाराच्या सोबत आहे. या दुःखातून लवकर सावरण्याचे बळ ईश्वर देव परिवारास देवो ही प्रार्थना करतो, असे सुधीर मुनगंटीवार यांनी म्हणाले.