मराठमोळी ही अभिनेत्री दरवर्षी एका मुलाला घेते दत्तक, वाचून तुम्हीही कराल तिच्या कामाचं कौतुक
By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2023 06:12 PM2023-07-12T18:12:25+5:302023-07-12T18:18:32+5:30
ही अभिनेत्री दरवर्षी एका मुलाला दत्तक घेऊन त्याच्या पालनपोषणाची जबाबदारी सांभाळतात.
'बाईपण भारी देवा' (Baipan Bhaari Deva) चित्रपटाची सध्या सगळीकडे जोरदार चर्चा सुरू आहे. या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर खूप चांगला प्रतिसाद मिळतो आहे. सहा बहिणींची अनोखी गोष्ट सांगणारा हा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक थिएटरमध्ये गर्दी करत आहेत. या चित्रपटाच्या निमित्ताने अभिनेत्री सुकन्या मोने प्रकाशझोतात आल्या आहेत. एक दर्जेदार अभिनेत्री म्हणून त्या ओळखल्या जातात पण सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या उत्तम व्यक्तिमत्व म्हणूनही त्या ओळखल्या जातात. त्यांची ही दुसरी बाजू बऱ्याच जणांना माहित नाही. पण नुकत्याच एका कार्यक्रमात सुकन्या मोने यांनी सांगितले की त्या दरवर्षी एका मुलाला दत्तक घेऊन त्याच्या पालनपोषणाची जबाबदारी सांभाळतात.
याबाबत सुकन्या मोने सांगतात की, आमच्या आईवडिलांनी आम्हा मुलांना त्यांच्या स्वतःच्या पायावर उभं केलं आहे. आमच्या कमाईतून मिळणारे पैसे कुठे आणि कसे खर्च करायचे हे मी त्यांच्याकडे पाहूनच शिकलेली आहे. आपल्या कमाईतील काही रक्कम मी देवस्थानासाठी देते तर काही रक्कम मी एनजीओ सारख्या गरजू संस्थांना देते. अशा माध्यमातून मी अनेक संस्थांशी जोडली गेलेली आहे. काही एनजीओ संस्था अशा आहेत ज्यांचे कार्य अजूनही लोकांपर्यंत पोहोचलेले नाही. अशा संस्थांना मी नेहमी शक्य तेवढी मदत करत असते.
अभिनेत्रीचं होतंय कौतुक
सुकन्या मोने यांचे हे सामाजिक कार्य समजल्यावर त्यांचे अनेकांनी कौतुक केले आहे. सुकन्या मोने या बालमोहन शाळेत शिकल्या. त्यामुळे शाळेतल्या शिक्षिका विद्याताई पटवर्धन यांच्याशी त्यांचे सख्य तयार झाले आहे. विद्याताई पटवर्धन यांनी आजवर त्यांच्या शाळेतील मुलांना अभिनयाचे धडे देऊन मराठी इंडस्ट्रीत मोठी संधी मिळवून दिली होती. मात्र वयोपरत्वे विद्याताई पटवर्धन या आता आजारपणामुळे अंथरुणाला खिळुन आहेत. त्यांच्या मदतीला बालमोहन शाळेतील शिक्षक वर्ग आणि माजी विद्यार्थ्यांनी एकत्रित येऊन आर्थिक मदत उभी केली आहे. अशातच सुकन्या मोनेसुद्धा विद्याताईंच्या मदतीला वेळोवेळी धावून येत असतात.