"पद्मश्री अशोक सराफ...ऐकायलाच किती छान वाटतं", मिलिंद गवळींनी पोस्ट लिहित दिल्या शुभेच्छा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 26, 2025 11:19 IST2025-01-26T11:18:16+5:302025-01-26T11:19:07+5:30

मिलिंद गवळींनी अशोक सराफ यांच्यासोबतचे फोटो शेअर करत लांबलचक पोस्ट लिहिली आहे.

milind gawali shared post congratulated ashok saraf on padma shri award | "पद्मश्री अशोक सराफ...ऐकायलाच किती छान वाटतं", मिलिंद गवळींनी पोस्ट लिहित दिल्या शुभेच्छा

"पद्मश्री अशोक सराफ...ऐकायलाच किती छान वाटतं", मिलिंद गवळींनी पोस्ट लिहित दिल्या शुभेच्छा

विनोदाचा सम्राट, मराठीतील दिग्गज अभिनेते अशोक सराफ (Ashok Saraf) यांना केंद्र सरकारने 'पद्मश्री' पुरस्कार जाहीर केला आहे. अशोक मामांना हा देशातील सर्वोच्च पुरस्कारांपैकी एक पुरस्कार जाहीर झाल्याने सगळेच आनंदित आहेत. आपल्या लाडक्या अभिनेत्याच्या मेहनतीला यश आल्याची अनेकांची भावना आहे. अभिनेता मिलिंद गवळींनी (Milind Gawali) अशोक सराफ यांच्यासोबतचे फोटो शेअर करत लांबलचक पोस्ट लिहिली आहे. यामधून त्यांनी अशोक सराफ यांचं अभिनंदन केलं आहे. 

मिलिंद गवळी लिहितात, "पद्मश्री अशोक सराफ..हे ऐकायला किती छान वाटतं "पद्मश्री". आपल्या माणसाला "पद्मश्री" मिळालं याचा किती आनंद वाटतो. आमच्या अशोक मामांना "पद्मश्री" मिळाली याबद्दल मला खूपच आनंद झालाय. अनेक वर्षापासून अनेक चित्रपटांमध्ये मी अशोक मामांबरोबर काम केलं असल्यामुळे ही "पद्मश्री" जी पदवी त्यांना देण्यात आली ती पदवी ते किती Deserve करतात हे मला माहिती आहे. त्यांना पद्मश्री मिळायलाच हवी होती जी त्यांना मिळाली याचा मला खूपच आनंद झाला.

मी अशोक मामा बरोबर काम करायला सुरुवात केली त्याच्या 25 वर्ष किंवा 30 वर्ष आधीपासूनच त्यांनी मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टी गाजवली होती. मी त्यांच्याबरोबर पहिला चित्रपट  'सून लाडकी सासरची' केला तेव्हाच ते सुपरस्टार होते. त्यानंतर पुढे सात सिनेमांमध्ये मला त्यांच्याबरोबर काम करायचा योग आला आणि त्यांच्या बरोबर काम करण्याच्या माझ्या प्रवासामध्ये मी त्यांच्याकडून खूप शिकलो. त्यांचा एक उत्तम गुण म्हणजे कामाशी प्रामाणिक राहणे. अशोक मामांना मी सातत्याने त्यांच्या कामाविषयी आस्था , त्यांच्या भूमिकेवरचा त्यांचा पूर्वभ्यास, वक्तशीरपणा, आणि भरभरून Talent हे मी सातत्याने पहात आलोय. आमच्या सिनेमांमध्ये इतरही दिग्गज अनुभवी मोठे कलाकार असायचे पण त्यांच्यातलं वर्षानुवर्ष काम करून कामाविषयी Passion निघून गेल्याचं जाणवायचं. आणि एका बाजूला अशोक मामा 35-40 वर्ष सातत्याने काम करून सुद्धा कामाविषयीची त्यांची आस्था आणि त्यांचं नवोदित कलाकारास सारखं passion, energy बघून अचंबित व्हायला व्हायचं.


एखाद्या दिग्दर्शकाचं किंवा एखाद्या कलाकाराचा Casual Approach बघून अशोक मामांचा संताप व्हायचा. त्या कारणासाठी मी त्यांची बरेच वेळा चिडचिड सुद्धा पाहिली आहे. त्यांचं म्हणणं असायचं की जर प्रामाणिक सिनेमा करायचा नसेल तर मग करताच कशाला सिनेमा. का माझा आणि सगळ्यांचा वेळ फुकट घालवताय आणि प्रेक्षकांच्या पण डोक्याला का ताप देताय? सिनेमा करायचा असेल तर तो प्रामाणिकच केला पाहिजे असं त्यांचं सतत म्हणणं असायचं. खरच म्हणूनच ते एक वेगळे कलाकार आहेत, आणि कदाचित म्हणूनच इतक्या वर्षांनंतर त्यांच्या या प्रामाणिक कामाचं कौतुक म्हणून त्यांना पद्मश्री देण्यात आलाय.मी स्वतःला भाग्यवान समजतो की पद्मश्री अशोक सराफ यांच्याबरोबर मला काम करायची संधी मिळाली. अशोक मामा तुमचं खूप खूप अभिनंदन आणि पुढच्या तुमच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा."

Web Title: milind gawali shared post congratulated ashok saraf on padma shri award

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.