"मराठीतल्या सुपरस्टारवर ओरडायचं होतं", अनिरुद्धने सांगितला लक्ष्मीकांत बेर्डे यांच्याबरोबरचा शूटिंगचा किस्सा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2024 07:30 PM2024-04-16T19:30:07+5:302024-04-16T19:30:07+5:30

मिलिंद गवळींनी 'मराठा बटालियन' सिनेमात लक्ष्मीकांत बेर्डे यांच्याबरोबर काम केलं होतं. या सिनेमाची आठवण त्यांनी पोस्टमधून सांगितली आहे. 

milind gawli shared experienced of shooting with laxmikant berde marathi batallion movie | "मराठीतल्या सुपरस्टारवर ओरडायचं होतं", अनिरुद्धने सांगितला लक्ष्मीकांत बेर्डे यांच्याबरोबरचा शूटिंगचा किस्सा

"मराठीतल्या सुपरस्टारवर ओरडायचं होतं", अनिरुद्धने सांगितला लक्ष्मीकांत बेर्डे यांच्याबरोबरचा शूटिंगचा किस्सा

'आई कुठे काय करते' या मालिकेतून प्रेक्षकांचं मनोरंजन करत असलेले मिलिंद गवळी मराठी सिनेसृष्टीतील सुप्रसिद्ध अभिनेते आहेत. अनिरुद्धची भूमिका साकारून ते घराघरात पोहोचले. पण, त्यांनी याआधी अनेक सुपरहिट मराठी सिनेमांमध्ये काम केलं आहे. अशाच सिनेमांपैकी एक म्हणजे 'मराठा बटालियन'. मिलिंद गवळी यांनी या सिनेमात लक्ष्मीकांत बेर्डे, रमेश भाटकर, विजय चव्हाण या दिग्गजांसोबत काम केलं होतं. या सिनेमाची आठवण त्यांनी पोस्टमधून सांगितली आहे. 

या सिनेमातील एक सीनचा व्हिडिओ मिलिंद गवळींनी शेअर केला आहे. हा व्हिडिओ शेअर करत त्यांनी शूटिंगदरम्यानचा किस्सा सांगितला आहे. 

मिलिंद गवळींची पोस्ट

लक्ष्मीकांत बेर्डे, विजय चव्हाण, रमेश भाटकर..मराठी चित्रपट व नाट्य सृष्टीतले दिग्गज असे कलाकार, ज्यांच्याबरोबर मला काम करायला मिळालं. लक्ष्मीकांत बेर्डे यांच्याबरोबर “मराठा बटालियन”मध्ये काम करायची संधी मिळाली. या सिनेमांमध्ये मला अमर भोसलेच्या भूमिकेसाठी घेण्यात आलं. हा व्हिडिओ जो मी upload केला आहे तो माझा या चित्रपटातला पहिलाच सीन होता. मराठीतल्या सुपरस्टारला हाताला धरून त्याच्यावर ओरडायचं होतं. पहिलाच दिवस पहिला सीन...नाशिकच्या कुठल्यातरी डोंगरात शूटिंग, दडपण आलं होतं. कदाचित लक्ष्मीकांत बेर्डे यांना त्याची जाणीव झाली असावी आणि त्यांनी “आपण रिहर्सल करूया" असं सांगून मला कंम्फर्टेबल केलं. हा सीन झाल्यानंतरसुद्धा त्यांनी माझ्या कामाचं कौतुक केलं.

अख्या shooting भर हसत खेळत मजा मस्ती करत हा "मराठा बटालियन" त्यांनी पूर्ण केला. विजू मामांची आणि त्यांची खूप वर्षांपासूनची घट्ट मैत्री होतीच. त्यामुळे ते दोघे मिळून असंख्य लोकांना पिडायचे, सतत हस्त खेळत वातावरण ठेवायचे. विजू मामांबरोबर मी जवळजवळ आठ एक सिनेमे केले. मराठी इंडस्ट्रीमधले ते सगळ्यात बिझी स्टार होते. एका वेळेला त्यांचे सहा सात सिनेमे चालूच असायचे. असा हा एकमेव स्टार होता ज्याच्या डबिंगसाठी ‘ते‘ जिथे shooting करत असतील, तिथे अरेंजमेंट, तिथे डबिंग स्टुडिओ बुक केला जायचा, बरं त्यांनी कधीही मोबाईलचा वापर केला नाही. त्यांच्याकडे मोबाईलच नव्हता. फारच सुपर टॅलेंटेड असा कलाकार विजू मामा होते, “तू तू मी मी" या एका नाटकात त्यांनी 14 भूमिका केल्या होत्या. 

रमेश भाटकर तर stylised स्टार होते आणि फार भारी कलाकार पण होते. या तिघांनीही माझ्यावर खूप प्रेम केलं. मला खूप प्रोत्साहन दिलं. कौतुक केलं.  हे तिघेही दिग्गजच होते. पण, कधीही त्यांनी गर्व केला नाही. उलट आमच्यासारख्या नवोदित कलाकाराला खूप सांभाळून घेऊन कामं केली. सिनेमांचे जुने सीन्स बघत असताना सतत असं वाटतं की ते आपल्यामध्ये आहेत ते आपल्याला सोडून गेलेच नाहीयेत. त्यांच्याबरोबर काम करणं मी सतत miss करत असतो. प्रेक्षकांच्या मनामध्ये तर त्यांनी त्यांची जागा निर्माण केलीच आहे. पण माझ्या मनामध्ये सुद्धा त्यांची खूप मोठी जागा आहे ! ते आता जिथे कुठे असतील तिथे सुद्धा ते एकमेकांची खेचत असतील मस्करी करत असतील, आजूबाजूंच्यांचं पोट दुखेपर्यंत त्यांना हसवत असतील, आनंद पसरवत असतील.

मिलिंद गवळींच्या या पोस्टवर चाहत्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे. सध्या ते 'आई कुठे काय करते'  मालिकेतून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहेत. 

Web Title: milind gawli shared experienced of shooting with laxmikant berde marathi batallion movie

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.