'रामराया'चा गजर अन् 'श्रीराम अँथम'! 'मिशन अयोध्या' सिनेमाचं म्युझिक लाँच

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2024 12:35 IST2024-12-30T12:33:46+5:302024-12-30T12:35:53+5:30

सोहळ्यासाठी विशेष अतिथी म्हणून उत्तर प्रदेशातील लोकप्रिय 'साधो बँड'ला आमंत्रित करण्यात आले होते

mission ayodhya upcoming marathi movie music launch shiram anthem and chanting of shriram naam | 'रामराया'चा गजर अन् 'श्रीराम अँथम'! 'मिशन अयोध्या' सिनेमाचं म्युझिक लाँच

'रामराया'चा गजर अन् 'श्रीराम अँथम'! 'मिशन अयोध्या' सिनेमाचं म्युझिक लाँच

'मिशन अयोध्या' हा मराठी सिनेमा २४  जानेवारी २०२५ रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे. ‘आर के योगिनी फिल्म्स प्रॉडक्शन प्रा. लि.’ निर्मित 'मिशन अयोध्या' या चित्रपटाचा म्युझिक लाँच सोहळा २९ डिसेंबरला दादर येथील वीर सावरकर ऑडिटोरियममध्ये हा सोहळा पार पडला. या सोहळ्यासाठी विशेष अतिथी म्हणून उत्तर प्रदेशातील लोकप्रिय 'साधो बँड'ला आमंत्रित करण्यात आले होते.  

या सोहळ्यात भव्य एलईडी वॉल आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने सादर झालेल्या रामललाच्या सूरमयी मोहक रूपाने संपूर्ण उपस्थितांना राममय करून टाकले. या अद्वितीय सादरीकरणाने ऑडिटोरियममधील रसिक प्रेक्षक भक्तिरसात न्हाऊन निघाले आणि 'मिशन अयोध्या'च्या संगीत प्रकाशन सोहळ्याबद्दल सर्वांच्या मनात अपार कुतूहल व उत्कंठा निर्माण झाली. लोकप्रिय गायक जावेद अली यांच्या सुमधुर आवाजातील 'रामराया रामराया' या अप्रतिम गीताला संगीतकार एस. डी. सद्गुरु यांनी तितक्याच खुबीने सादर केले, ज्यामुळे वन्स मोअरचा गजर झाला. यानंतर सादर केलेल्या 'श्रीराम अँथम'ने वातावरण भारावून गेले. प्रभू श्रीरामांवर आधारित हे अत्यंत प्रेरणादायी अँथम सॉंग प्रेक्षकांच्या हृदयाला भिडले.

संगीतकार एस. डी. सद्गुरु यांचे मनोगत

"'मिशन अयोध्या'सारख्या भव्य आणि भावनिक चित्रपटासाठी संगीत दिग्दर्शक म्हणून माझ्या करिअरची सुरुवात होणे, ही माझ्यासाठी अत्यंत अभिमानास्पद गोष्ट आहे. या चित्रपटाच्या प्रसिद्धी मोहिमेची सुरुवात थेट संगीत लोकार्पण सोहळ्याद्वारे होणे, हा माझ्या आयुष्यातील एक अविस्मरणीय क्षण आहे, या चित्रपटासाठी संगीत देताना माझ्या मनात असलेला भक्तीभाव प्रत्येक सुरात आणि चालीत प्रतिबिंबित झाला आहे. लोकप्रिय गायक जावेद अली यांच्यासह प्रतिभावान गीतकार अभिजीत जोशी, पूर्वा ठोसर, आणि समीर रमेश सुर्वे यांच्या गाण्यांचे शब्द आणि चाली विलक्षण असून चित्रपटाच्या भावनात्मक कथानकाला तंतोतंत साजेशा आहेत." असे संगीत दिग्दर्शक एस. डी. सद्गुरु यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले.

या चित्रपटाविषयी बोलताना लेखक-दिग्दर्शक समीर रमेश सुर्वे म्हणाले, "'मिशन अयोध्या' हा चित्रपट फक्त एक कथा नाही, तर एक भावनिक आणि आव्हानात्मक प्रवास आहे. चित्रपटातील सर्व गाणी अद्वितीय आणि दर्जेदार असून, विलक्षण कथानक आणि प्रभावी सादरीकरणामुळे हा चित्रपट प्रेक्षकांसाठी एक अविस्मरणीय अनुभव ठरणार आहे. निर्माते कृष्णा दादाराव शिंदे आणि योगिता कृष्णा शिंदे यांच्या पाठबळामुळे, तसेच कलावंत, गायक, आणि तंत्रज्ञांच्या अथक साथीमुळे हा प्रवास अविस्मरणीय झाला आहे. प्रसिद्धी मोहिमेची सुरुवात ज्या भक्तिमय वातावरणात झाली, त्याने आम्हाला प्रचंड ऊर्जा दिली आहे."

Web Title: mission ayodhya upcoming marathi movie music launch shiram anthem and chanting of shriram naam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.