'हिरकणी'ला थिएटर द्या नाहीतर खळखट्याक, मनसेचा थिएटर मालकांना इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2019 05:40 PM2019-10-22T17:40:14+5:302019-10-22T17:40:47+5:30
हिरकणी चित्रपटाला थिएटर दिले नाही तर काचा फुटणार, असा थेट इशारा महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेने दिला.
मराठी चित्रपटांना सुगीचं दिवस आले आहेत, असे आपण बऱ्याचदा बोलतो किंवा ऐकतो. मराठी सिनेसृष्टीत विविध विषय हाताळताना पहायला मिळतात. तसेच मराठीतील प्रेक्षकराजादेखील तितकाच जागृत झाला आहे. मात्र बऱ्याचदा मराठी चित्रपटांना थिएटरमध्ये शोज मिळणं कठीण होतं. तसेच पुन्हा एकदा मराठी चित्रपट 'हिरकणी'च्या बाबतीत झालं आहे.
प्रसाद ओक दिग्दर्शित 'हिरकणी' हा चित्रपट येत्या २४ ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होत आहे तर अक्षय कुमारचा 'हाऊसफुल ४' २६ ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होत आहे. 'हाऊसफुल ४'मुळे मराठी चित्रपटाला थिएटर मिळत नसल्याने मनसेने पुन्हा एकदा खळखट्याकचा इशारा दिला आहे. हिरकणी चित्रपटाला थिएटर दिले नाही तर काचा फुटणार, असा थेट इशारा महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेने दिला.
यासंदर्भात उद्या (२३ ऑक्टोबर) मनसे कार्यकर्ते थिएटर मालकांची भेट घेणार आहेत. मनसेनं मराठी चित्रपटाला स्क्रीन देण्यासाठी आम्ही भांडतोय. तो आमचा हक्कच आहे. त्यामुळे थिएटर मालकांनी आम्हाला स्क्रीन द्यावी अन्यथा पुढे होणाऱ्या परिणामाला सामोरे जावे, असा इशारा दिला आहे.
बऱ्याचदा थिएटरमध्ये व प्राईम टाईममध्ये शोज मिळत नाहीत. त्यामुळे अनेक कलाकारांनी याबाबत सोशल मीडियावर नाराजी व्यक्त केली आहे.
मनसेने दिलेल्या या इशाऱ्यानंतर आता हिरकणीला शोज मिळतात की नाही, हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षकराजा उत्सुक आहे.