'या' एका कारणामुळे मोहन जोशींनी फिरवली बॉलिवूडकडे पाठ; बऱ्याच वर्षांनी सांगितलं कारण
By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2023 12:29 PM2023-06-21T12:29:56+5:302023-06-21T12:30:38+5:30
Mohan joshi: गेल्या काही काळापासून त्यांचा बॉलिवूडमधील वावर कमी झाला आहे. किंबहुना त्यांनी हिंदी सिनेमांमध्ये काम करणं बंद केलं आहे.
आपल्या दमदार अभिनयशैलीमुळे चित्रपटसृष्टी गाजवणारे ज्येष्ठ अभिनेता म्हणजे मोहन जोशी (mohan joshi). कधी नायक तर कधी खलनायक होऊन त्यांनी प्रत्येक भूमिकेला न्याय दिला. त्यामुळे आजही प्रेक्षकांमध्ये त्यांच्या भूमिकेची चर्चा रंगते. मोहन जोशी यांनी मराठीसह बॉलिवूडसिनेमांमध्येही काम केलं आहे. मात्र, गेल्या काही काळापासून त्यांचा बॉलिवूडमधील वावर कमी झाला आहे. किंबहुना त्यांनी हिंदी सिनेमांमध्ये काम करणं बंद केलं आहे. या मागचं कारण त्यांनी अलिकडेच एका मुलाखतीमध्ये दिलं.
"बॉलिवूडमध्ये मला बरंच काम करता आलं यासाठी मी स्वत:ला नशीबवान समजतो. पण, हिंदीमध्ये पदार्पण करताना मला भाषेची अडचण होती. बहुतांश मराठी लोकांना ती असते. भूकंप हा माझा पहिला हिंदी सिनेमा होता. या सिनेमात मी साकारलेली भूमिका हिंदी-मराठी अशा दोन्ही भाषा बोलणारी होती त्यामुळे त्यात काही वाटलं नाही. मात्र,एलान या सिनेमाच्या वेळी मला माझ्या भूमिकेचं डबिंग करण्यापासून रोखलं. या सिनेमात मी साकारत असलेल्या भूमिकेच्या तोंडी बरेच उर्दू शब्द होते. त्यामुळे उच्चारतांना ते चुकायचे. म्हणूनच,मला माझ्या भूमिकेचं डबिंग करु देत नव्हते. त्यानंतर मी भाषेचा अभ्यास केला. लोकांचे उच्चार, टोन शिकून घेतलं. त्यानंतर माझं हिंदी सुधारत गेलं. आणि, मग मी माझ्या भूमिकेचं डबिंग केलं. या सिनेमानंतर मी ३०० ते ३५० हिंदी सिनेमांमध्ये काम केलं", असं मोहन जोशी म्हणाले.
पुढे ते म्हणतात, "मी हिंदी सिनेमांमध्ये बऱ्याचदा खलनायिकी भूमिका साकारल्या. अमरिश पुरी मला विशेष आवडायचे. त्यांच्यासोबत मी ६-७ सिनेमा केले. त्यांच्यानंतर शक्ती कपूर, परेश रावल, किरण कुमार, मुकेश खन्ना हे त्या काळचे गाजलेले खलनायक. त्यांच्यासोबत माझी मैत्री झाली. एकत्र सिनेमा केले. पण, २००३ साली गंगाजल हा सिनेमा केल्यानंतर मी हिंदी सिनेमातलं काम ठरवून थांबवलं. त्यानंतर जे पटलं,रुचलं तेच काम मी केलं." दरम्यान, मोहन जोशी मराठी सिनेसृष्टीतील नामवंत अभिनेता आहेत. नाटक, मालिका, सिनेमा अशा विविध माध्यमातून ते प्रेक्षकांसमोर आले आहेत.