दिग्दर्शक महेश कंद यांच्या ‘कंदील’चे मोशन पोस्टर सोशल मीडियावर रिलीज

By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2021 04:56 PM2021-05-12T16:56:45+5:302021-05-12T17:01:50+5:30

आशा आणि निराशेच्या लाटेवर स्वार होऊन श्रीमंत होऊ पाहणा-या स्लममधील पाच मुलांची अनोखी कथा ‘कंदील’मध्ये पहायला मिळणार आहे.

Motion poster of director mahesh kanda's 'kandil' released on social media | दिग्दर्शक महेश कंद यांच्या ‘कंदील’चे मोशन पोस्टर सोशल मीडियावर रिलीज

दिग्दर्शक महेश कंद यांच्या ‘कंदील’चे मोशन पोस्टर सोशल मीडियावर रिलीज

googlenewsNext

    ‘‘हातात घेऊन सपनाची भिंग निघाले बघाया सशाचे शिंग पोरांना चढली श्रीमंतीची झिंग’’ या वनलाईनवर आधारलेला एक नवा कोरा सिनेमा सध्या सर्वत्र चर्चेचा विषय ठरत आहे. ‘कंदील’ असं शीर्षक असलेला हा चित्रपट 19व्या पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये (पिफ) निवडला गेला आहे. महेश कंद या नवोदित दिग्दर्शकानं दिग्दर्शित केलेला ‘कंदील’ देश-विदेशातील सिनेमहोत्सवांमध्ये हजेरी लावणार असून लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

    एल. के. पिक्चर्स या बॅनरअंतर्गत निर्माते लक्ष्मण कंद, अभिजीत कंद आणि महेश कंद यांनी सोशल मीडियावर मोशन पोस्टर रिलीज करत ‘कंदील’ चित्रपटाची घोषणा केली आहे. आशा आणि निराशेच्या लाटेवर स्वार होऊन श्रीमंत होऊ पाहणा-या स्लममधील पाच मुलांची अनोखी कथा ‘कंदील’मध्ये पहायला मिळणार आहे. नुकत्याच रिलीज करण्यात आलेल्या मोशन पोस्टरला कंदीलाची पार्श्वभूमी असून, पाच तरूण दिसतात. एका झाडाखाली असलेल्या दगडावर तीन तरूण बसलेले आहेत, चौथा तरूण झाडाला टेकून तर पाचवा हाताची घडी घालून जणू भविष्यावर नजर रोखून उभा आहे. “श्रीमंत... श्रीमंत...’’ या गाण्याच्या (मुखडयाची) पार्श्वसंगीताची संगीतमय जोड या मोशन पोस्टरला देण्यात आली आहे. मोशन पोस्टर पाहिल्यावर या चित्रपटात काहीतरी वेगळं आणि वर्तमान समाजव्यवस्थेवर मनोरंजन शैलीत भाष्य करणारं कथानक पहायला मिळणार याची जाणीव होते.

    ‘कंदील’चं दिग्दर्शन करणा-या महेश कंद याचा इथवरचा प्रवास खूप संघर्षमय आहे. महेशने कोणत्याही फिल्म स्कूलमध्ये ऑफिशियल शिक्षण घेतलेले नाही. फिल्म फेस्टिव्हल, फिल्म क्लबमध्ये जाऊन सिनेमाचे तंत्र स्वतः आत्मसात केले आहे. महेशने यापूर्वा चीफ असिस्टंट डायरेक्टर म्हणून खूप काम केलं आहे. ‘हमने जीना सीख लिया’ या हिंदी सिनेमासाठी दिग्दर्शक मिलिंद उके यांना असिस्ट केलं आहे. बरीच वर्षे लेखक अमरजीत आमले यांच्या सान्निध्यात राहून महेशनं सिनेमाचे धडे गिरवले आहेत. फर्ग्युसन कॉलेजमध्ये पार्ट टाइम डिप्लोमा इन फोटोग्राफीचा कोर्स केला आहे. ‘कंदील’ची कथा हातात आल्यानंतर महेशने हा विषय पडद्यावर कशा पद्धतीने मांडायचा यासाठी तीन वर्ष स्लम मध्ये जाऊन रिसर्च केला. विशेष म्हणजे संपूर्ण सिनेमा आधी मोबाईलमध्ये चित्रीत करून पाहिला आणि नंतरच प्रत्यक्ष चित्रीकरणाला सुरूवात केली. शूटिंग करतानाही ‘कंदील’च्या टीमला ब-याच समस्यांचा सामना करावा लागला, तरीही न डगमगता महेशनं नवोदित कलाकार-तंत्रज्ञांचा संच सोबत घेऊन अखेर कंदील पेटवलाच. आज या कंदीलाचा प्रकाश सिनेमहोत्सवांच्या माध्यमातून देश-विदेशात आणि त्यानंतर प्रत्येक घराघरात प्रकाशाची किरणं पोहोचणार आहे.

    ‘कंदील’मध्ये महेश कंद, लक्ष्मण साळुंके, विनोद खुरंगळे, मंदार फाकटकर, दिव्यराज ओव्हाळ, दिलीप अष्टेकर आदी कलाकारांनी अभिनय केला आहे. अमरजीत आमले यांनी ‘कंदील’ची पटकथा लिहीली असून, महेश कंद आणि सुहास मुंडे यांच्या साथीनं त्यांनी गीतलेखनही केलं आहे. यावर्षा फिल्मफेअर पुरस्कारांमध्ये बाजी मारलेले तसेच ‘वळू’ व ‘देऊळ’ चित्रपटांचे संगीतकार मंगेश धाकडे यांनी गीतरचना संगीतबद्ध केल्या असून नंदेश उमप, जे. सुबोध आणि चंद्रदीप भास्कर यांनी ती गीते गायलेली आहेत. साऊंड मिक्सिंगचं काम अनुप देव यांनी केलं असून राष्ट्रीय पारितोषिक विजेता साऊंड डिझायनर महावीर साबन्नावर याने साऊंड डिझाईन केलं आहे. सिनेमॅटोग्राफी प्रसाद मोरे यांनी केली असून प्रॉडक्शन मॅनेजरची जबाबदारी विनोद खुरंगळे यांनी सांभाळली आहे. निलेश रसाळ आणि दिनेश भालेराव यांनी संकलन केले आहे.

Web Title: Motion poster of director mahesh kanda's 'kandil' released on social media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.