झाडीपट्टी रंगभूमीवर आधारित चित्रपट 'झॉलीवूड', पोस्टर केले प्रदर्शित
By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2021 08:59 PM2021-03-11T20:59:54+5:302021-03-11T21:00:47+5:30
विदर्भात प्रचंड लोकप्रिय असलेल्या झाडीपट्टी या नाटकाच्या खास प्रकारावर आधारित झॉलीवूड हा चित्रपट येत्या ९ एप्रिलला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
विदर्भात प्रचंड लोकप्रिय असलेल्या झाडीपट्टी या नाटकाच्या खास प्रकारावर आधारित झॉलीवूड हा चित्रपट येत्या ९ एप्रिलला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. नुकतेच सोशल मीडियाच्या माध्यमातून या चित्रपटाचे पोस्टर लाँच करण्यात आले आहे.
विशबेरी फिल्म्सच्या प्रियंका अगरवाल, अंशुलिका दुबे, शाश्वत सिंग यांनी चित्रपटाची निर्मिती केली असून अमित मासूरकर आणि डयुक्स फार्मिंग फिल्म्स चित्रपटाचे प्रस्तुतकर्ते आहेत. न्यूटन, सुलेमानी किडा असे दर्जेदार चित्रपट दिग्दर्शित केलेले अमित मासूरकर या चित्रपटाचे क्रिएटिव्ह प्रोड्यूसर देखील आहेत.
चित्रपटाचा दिग्दर्शक तृषांत इंगळेने स्वतः झाडीपट्टी नाटकांतून बालकलाकार म्हणून काम केले आहे. विदर्भात लोकप्रिय असलेल्या झाडीपट्टी नाटकांविषयी उर्वरित महाराष्ट्रात विशेष माहिती नाही. मात्र, झाडीपट्टी रंगभूमी हा अतिशय खास कलाप्रकार तर आहेच, पण झाडीपट्टी ही जणू एक इंडस्ट्रीच आहे. या प्रकारावर पहिल्यांदाच चित्रपट निर्मिती होत आहे. चित्रपटसृष्टीत करिअर करण्याच्या विचाराने तृषांतनं वयाच्या १६व्या वर्षी मुंबई गाठली. त्यानंतर लेखन, कास्टिंग डिरेक्शनचा अनुभव घेत आता 'झॉलीवूड" या चित्रपटाच्या रुपानं त्यानं पहिला चित्रपट दिग्दर्शित केला आहे.
चित्रपटाची कथा आसावरी नायडू, पटकथा तृषांत इंगळे, योगेश राजगुरू यांनी छायांकन वैभव दाभाडे यांनी संकलनाची जवाबदारी सांभाळली आहे. या चित्रपटाला फ्रान्समधील इंडियन फेस्टिव्हल ऑफ तौलौसमध्ये स्पेशल ज्युरी अॅवॉर्डने सन्मानित करण्यात आले होते.