मुळशी पॅटर्न या चित्रपटाला मिळतोय प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद
By ऑनलाइन लोकमत | Published: December 2, 2018 08:00 AM2018-12-02T08:00:00+5:302018-12-02T08:00:01+5:30
'मुळशी पॅटर्न' च्या दुसऱ्या आठवड्याची सुरुवातसुद्धा दमदार झाली आहे. मल्टिप्लेक्ससह सिंगल स्क्रीन चित्रपटगृहातसुद्धा प्रेक्षकांची तुफान गर्दी होत आहे. चित्रपटाने सर्वाधिक कमाई पुणे शहर आणि जिल्ह्यातून केली असून, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाड्याचे खेड्यापाड्यातील प्रेक्षक जवळच्या चित्रपटगृहात चित्रपट पाहायला येत आहेत.
प्रविण विठ्ठल तरडे लिखित, दिग्दर्शित ‘मुळशी पॅटर्न’ या मराठी चित्रपटाला पहिल्या आठवड्यात बॉक्स ऑफिसवर प्रेक्षकांची 'खतरनाक' पसंती मिळाली आहे. काल्पनिक कथेवर आधारीत, वास्तवाच्या जवळ जाणाऱ्या या चित्रपटाला संपूर्ण महाराष्ट्रात प्रेक्षकांची सहकुटुंब गर्दी होत असल्याचे बघायला मिळाले.
'मुळशी पॅटर्न' च्या दुसऱ्या आठवड्याची सुरुवातसुद्धा दमदार झाली आहे. मल्टिप्लेक्ससह सिंगल स्क्रीन चित्रपटगृहातसुद्धा प्रेक्षकांची तुफान गर्दी होत आहे. चित्रपटाने सर्वाधिक कमाई पुणे शहर आणि जिल्ह्यातून केली असून, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाड्याचे खेड्यापाड्यातील प्रेक्षक जवळच्या चित्रपटगृहात चित्रपट पाहायला येत आहेत. दोन–तीन वेळा चित्रपट पाहाणाऱ्या प्रेक्षकांची संख्याही मोठी आहे. चित्रपटाची कथा, सादरीकरण, कलाकारांचा अभिनय, चित्रीकरण उत्तम असल्याची प्रतिक्रिया प्रेक्षक देत आहेत. ‘’चित्रपटाचा विषय मातीतला आहे, यामुळे तो प्रेक्षकांना आवडेल असा मला विश्वास होता. चित्रपटगृहातून प्रेक्षक सुन्न होऊन बाहेर येत आहेत, हेच आमच्या टीमचे यश आहे. महाराष्ट्रातील प्रेक्षकांनी गेल्या तीन आठवड्यात तीन चित्रपटांना भरभरून प्रतिसाद दिला आहे, यातील दोन चित्रपटांच्या मागे मोठ्या स्टुडिओचे पाठबळ होते, आमच्या टीमकडे त्या तुलनेत प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्याची साधने कमी होती तरीही प्रेक्षकांनी सहकुटुंब आमच्या उत्कृष्ट कलाकृतीला उत्स्फूर्त दाद दिली याबद्दल मी प्रेक्षकांचे आभार मानतो,’’अशी भावना 'मुळशी पॅटर्न' चे लेखक, दिग्दर्शक प्रविण विठ्ठल तरडे यांनी व्यक्त केली.
मुळशी पॅटर्न या चित्रपटात मोहन जोशी, महेश मांजरेकर, उपेंद्र लिमये, प्रवीण तरडे, मालविका गायकवाड, सविता मालपेकर, सुरेश विश्वकर्मा, क्षितिज दाते, सुनील अभ्यंकर,ओम भूतकर यांच्या महत्वाच्या भूमिका आहेत. चित्रपटाची गीते प्रणित कुलकर्णी यांची असून संगीत नरेंद्र भिडे यांनी दिले आहे. नृत्य दिग्दर्शन उमेश जाधव यांचे तर छायाचित्रण महेश लिमये यांनी केले आहे. चित्रपटाचे प्रस्तुतकर्ते अभिजित भोसले जेन्यूइन प्रॉडक्शन्स एल. एल. पी. आणि किरण दगडे पाटील प्रॉडक्शन आहेत.
प्रेक्षकांना या चित्रपटाची कथा, कलाकारांचा अभिनय प्रचंड भावत आहे. त्यांनी दिलेल्या उत्तम प्रतिसादामुळेच ‘मुळशी पॅटर्न’च्या शोची संख्या सर्वत्र वाढली आहे.