मुंबईत पुन्हा पावसाचा जोर वाढला, सई ताम्हणकर म्हणते - 'आज मुकाट्याने घरीच बसा'

By ऑनलाइन लोकमत | Published: July 9, 2024 09:52 AM2024-07-09T09:52:45+5:302024-07-09T09:56:08+5:30

सई ताम्हणकरने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक स्टोरी शेअर केली आहे.

Mumbai Weather Rain Update Marathi Actress Sai Tamhankar Appeal To Mumbaikar Not To Leave Home | मुंबईत पुन्हा पावसाचा जोर वाढला, सई ताम्हणकर म्हणते - 'आज मुकाट्याने घरीच बसा'

मुंबईत पुन्हा पावसाचा जोर वाढला, सई ताम्हणकर म्हणते - 'आज मुकाट्याने घरीच बसा'

मुंबईत मुसळधार पावसामुळे लोकल सेवा, रस्ते वाहतूक विस्कळीत झाले आहेत. अनेक ठिकाणी सखल भागात पाणी तुंबलं आहे. हवामान विभागाने मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाचा अलर्ट जारी केला आहे. हवामान विभागाने मुंबईसाठी रेड अलर्ट जारी केला आहे.  मुंबईतील नागरिकांना गरज असेल तरच घराबाहेर पडण्याचं आवाहन करण्यात येत आहे.  अभिनेत्री सई ताम्हणकरनेही सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत नागरिकांना घरीच थांबण्याचे आवाहन केले आहे.

सई ताम्हणकरने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक स्टोरी शेअर केली आहे. यात पाऊस पडतानाचा फोटो शेअर करत त्यावर 'आज मुकाट्यानं घरी बसा' असं तिनं लिहिलं. या पोस्टद्वारे सईने मुंबईकरांना घरीच थांबण्याचे आवाहन केलं आहे. यासोबतच सईने तिच्या पोस्टमध्ये #takecaremumbai असा हॅशटॅग वापरुन मुंबईकरांना काळजी घेण्याचा सल्लाही दिला.

मुंबई शहरासह उपनगरात काल रात्रीपासून सुरु असलेली पावसाची संततधार अद्यापही कायम आहे. मुंबईत सध्या सर्वत्र मुसळधार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे मुंबईतील जनजीवन विस्कळीत झाले आहे. त्यातच आज दिवसभर मुंबईत अति मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

समुद्रात मोठी भरती असल्याने सर्व मुंबईकरांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तसेच खबरदारीचा उपाय म्हणून तसेच विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून मुंबई महानगरातील सर्व महानगरपालिका, शासकीय आणि खासगी माध्यमांच्या शाळांना तसेच महाविद्यालयांना सुटी जाहीर करण्यात आली आहे.  मध्य रेल्वेकडून गरज असेल तरच प्रवास करण्याचं आवाहन मुंबईकरांना करण्यात आलं आहे.

Web Title: Mumbai Weather Rain Update Marathi Actress Sai Tamhankar Appeal To Mumbaikar Not To Leave Home

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.