मुंबईत साकारणार नाटकांचे संग्रहालय, सखी गोखले यांच्या हाती संग्रहालयाची धूरा
By ऑनलाइन लोकमत | Published: June 2, 2022 12:04 PM2022-06-02T12:04:59+5:302022-06-02T12:05:31+5:30
गिरगाव चौपाटीवरील बिर्ला क्रीडा केंद्रच्या जागी मराठी नाटकाचा इतिहास सांगणारे भव्य-दिव्य 'मराठी नाट्य विश्व' उभे राहणार.
संजय घावरे
मुंबई : मुंबईतील गिरगाव चौपाटीवरील बिर्ला क्रीडा केंद्रच्या जागी मराठी नाटकाचा इतिहास सांगणारे भव्य-दिव्य 'मराठी नाट्य विश्व' उभे राहणार आहे. मराठी नाटकाच्या सर्व शाखा आणि सर्व नाट्यकर्मींना सामावून घेणाऱ्या या संग्रहालयाच्या उभारणीतील महत्त्वाची जबाबदारी अभिनेत्री सखी गोखलेकडे सोपवण्यात आली आहे.
'मराठी नाट्य विश्व'च्या प्रोग्रॅमिंग, डिझायनिंग म्हणजे क्युरेशन आणि म्युझियमची जबाबदारी सखी गोखले सोपवण्यात आली आहे. याबाबत 'लोकमत'शी बोलताना सखी म्हणाली की, "मी या प्रोजेक्टची म्युझिओलॉजिस्ट आहे. 'मराठी नाट्य विश्व'च्या इमारतीमध्ये एक थिएटरही असेल आणि अॅम्फी थिएटरही असेल. संग्रहालयामध्ये मराठी नाटकाला समर्पित तीन गॅलरीज असतील. थिएटरसह या तीन गॅलरीजचे डिझायनिंग आणि प्रोग्रॅमिंग मी करणार आहे. म्युझिअम्स आणि आर्ट गॅलरीजमध्ये कोणते प्रेक्षक येणार हे पाहून डिझाइन केल्या जातात. प्रदर्शन मांडण्यासारख्या कोणत्या वस्तू आहेत आणि कोणता इतिहास सांगायचा आहे यांचा अभ्यास करून डिझाइन तयार केले जाईल. प्रथमदर्शनी लूक कसा असेल, तिथे येणाऱ्या रसिकाला काय पहायला आवडेल, इमारतीत पाऊल टाकल्यानंतर बाहेर पडेपर्यंत एकूणच त्याचा अनुभव कसा असायला हवा यावर काम करणार आहे. यासोबतच प्रोग्रॅमिंगही करणार आहे."
हे सर्व काम पूर्ण करण्यासाठी दोन वर्षांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. याचे बऱ्यापैकी काम आतापर्यंत पूर्ण झालेले आहे. तीन मजली इमारत आहे. जगभरातील नाटकांचे अभ्यासक आणि रसिकांसाठी एक हक्काचे दालन असावे या मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या संकल्पनेतून 'मराठी नाट्य विश्व'ची वास्तू उभारली जाणार आहे. राज्य सरकार आणि मुंबई महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने हे स्वप्न प्रत्यक्षात साकार होणार आहे. नुकताच 'मराठी नाट्य विश्व'चे बोधचिन्ह आणि वास्तूचे स्वरूप लोकार्पण करण्यात आले.
या दोहोंचा संगम घडवायचा आहे : सखी गोखले
"मी आजच्या पिढीची प्रतिनिधी असल्याने या कामासाठी माझी निवड केली गेली असावी. आजची पिढी संवादासाठी डिजिटल माध्यमाचा वापरते आणि मराठी नाटक अद्याप डिजिटलायजेशनपासून बरेच दूर आहे. या दोघांचा संगम घडवण्याचे काम करायचे आहे. वास्तवात आपण जसा संग्रहालयाचा अनुभव घेतो आणि डिजिटली जसे संवाद साधतो त्यांचा संगम इमारतीत असावा अशी इच्छा आहे. आधुनिक टेक्नॅालॅाजीच्या आधारे हे संग्रहालय बनवले जाईल. त्यामुळे विशिष्ट साच्यातील म्युझियम्सपेक्षा हे वेगळे असेल. परस्परांशी आपसुक संवाद साधणारा, आकर्षक, लक्षवेधी अनुभव देण्याचा प्रयत्न असेल. मला फार उत्सुकता आहे. 'मराठी नाट्य विश्व'सारखे संग्रहालय कुठेही नसेल. त्यामुळे निश्चितच जबाबदारीही वाढणार आहे.
लंडनमध्ये घेतले क्युरेशनचे शिक्षण
लंडनमधील रॅायल कॅालेज ऑफ आर्टसमधून आर्ट क्युरेशनमध्ये सखीने पोस्ट ग्रॅज्युएशन पूर्ण केले. त्यानंतर भारतात आल्यावर तिच्याकडे या प्रोजेक्टची जबाबदारी देण्यात आली. आई (शुभांगी गोखले) आणि सुव्रतची साथ असल्याने सखी पुढील शिक्षण घेऊ शकली. शिक्षण पूर्ण करून सखी परतली तेव्हा 'मराठी नाट्य विश्व'ची चर्चा सुरू होती. सखीने अशा प्रकारचे शिक्षण घेतल्याचे सुबोध भावेला समजले आणि त्याने तिचे नाव सुचवले. त्यानंतर बऱ्याच बैठका झाल्या, बरीच प्रेझेंटेशन्स झाली आणि संपूर्ण प्रोसेस पूर्ण केल्यावरच सखीकडे हे काम सोपवण्यात आले. सुबोधसोबतच विजय केंकरे, राजन भिसे हे कलाकारही 'मराठी नाट्य विश्व'च्या सल्लागार पॅनलवर आहेत. त्यांचे व्हिजनही या प्रोजेक्टला लाभणार आहे.