'आईला माझी डायरी सापडली, अन् मला झाडूनं बेदम चोपलं', प्राजक्ता माळीनं सांगितला 'तो' किस्सा
By ऑनलाइन लोकमत | Published: May 5, 2023 12:14 PM2023-05-05T12:14:21+5:302023-05-05T12:14:41+5:30
Prajakta Mali : प्राजक्ता माळीने तिच्या आयुष्यातील डायरीसंदर्भातील मनोरंजक किस्सा सांगितला.
बऱ्याच जणांना आयुष्यात घडणाऱ्या काही गोष्टी डायरीत लिहिण्याची सवय असते. अशीच काहीशी सवय अभिनेत्री प्राजक्ता माळी (Prajakta Mali) हिलादेखील होती. तिला अशाच काही आठवणी डायरीत लिहून ठेवायला आवडायच्या. मात्र एका प्रसंगानंतर त्या रोजनिशीचे रूपांतर कवितेत झाले तेव्हा प्राजक्ता एक कवयित्री आहे हे सगळ्यांना समजले. गेल्या वर्षी प्राजक्ताने तिच्या कवितांचा संग्रह पुस्तकरूपाने प्रकाशित केला. याचे सर्व श्रेय ती तिच्या आईलाच देते. प्राजक्ताच्या कविता कशा घडत गेल्या याचा आढावा तिने त्या कार्यक्रमात नमूद केला होता. प्राजक्ताला डायरी लिहण्याची सवय होती. आपल्या आयुष्यात घडलेल्या सर्वच गोष्टी आपण कोणाशीही बोलू शकत नाही. तेव्हा त्या कुठेतरी लिहिल्या जाव्यात अशी तिची इच्छा होती. म्हणून प्राजक्ता या सर्व गोष्टी डायरीत नोंद करू लागली. या डायरीसंदर्भातला एक इंटरेस्टिंग किस्सा प्राजक्ता माळीने सांगितला.
प्राजक्ता माळी म्हणाली की, आपल्या आयुष्यात जे जे खरे असते ते आपण कोणाला सांगू शकतो का? तेव्हा त्यांची मानसिकता काय असते ते आपल्याला जज करत असतील का? गैर फायदा घेत असतील का, त्याची थट्टा करत असतील का? असे कितीतरी विचार मनात येत असतात तेव्हा आपण सगळे नाही बोलू शकत. एखादा प्रसंग सांगताना माझे कसे बरोबर त्यांचे कसे चुकले हे आपण करतोच करतो. तर मला हे जाम आवडायचे की मला जे वाटतेय ते नेमकेपणाने मी पांढऱ्या वर काळे करावे. मला असेही वाटते की ते केल्याने आपल्याला नेमके काय वाटते, काय आवडते, काय आवडत नाही, काय भावते, त्या दिवशी आपल्याला काय वाटले होते तो प्रसंग घडल्यानंतर आणि आज आपण असे हसतहसत होऊन ते वाचतोय हे बघायला छान वाटते. माझ्याकडे २००७, २००८च्याही डायऱ्या आहेत.
त्या दिवशी झाडूने बेदम चोपलं...
ती पुढे म्हणाली की, अशातच कोणे एके दिवशी माझ्या आईला माझी डायरी सापडली आणि ती माझी वाटच बघत होती , त्यावेळी मी अकरावीत होते. तिने मी घरी आल्यानंतर मला झाडूने बेदम चोपले. म्हणजे तुम्ही इमॅजिन करा मी त्या डायरीत काय काय लिहिलं असेल. त्या प्रसंगानंतर ठरलं की रोजनिशी लिहायची नाही. निदान आपल्याला कुलुप बंद कप्पा मिळत नाही तोपर्यंत तरी लिहायची नाही. पण पुण्यात आल्यानंतर ते काही शक्यच झाले नाही.
माझा कवितेचा प्रवास असा घडत गेला...
मला हे जे सतत वाटत राहीलं की काहीतरी बोलायचंय, स्वतःशी संवाद साधायचाय माझ्या भावना मांडायच्या अशातून ती कविता सुचली, झाली असे मी म्हणेन. मी माझ्या युट्युबवर दोन कविता केल्या होत्या त्या धनंजय गांगल यांनी पाहिल्या. त्यांनी माझ्या कविता ग्रंथालिकडे पाठवल्या या त्यांच्या संमतीने त्या पुस्तकरूपात प्रकाशित करण्यात आल्या. असा माझा कवितेचा प्रवास घडत गेला, असे प्राजक्ता सांगते.
आयुष्यात अनेक ब्रेकअप झाले...
प्राजक्ताने यावेळी तिच्या खाजगी आयुष्यबद्दलही अनेक खुलासे केले. आपल्या आयुष्यात अनेक ब्रेकअप झाले असेही ती म्हणाली. यातूनच मला जे वाटत राहिले ते मी कोणाशीही बोलू शकत नव्हते. समोरचा व्यक्ती याबाबत आपल्याला कसा जज करेल याची तिला भीती होती. त्यामुळे आपण हे कुठेतरी लिहून ठेवायला हवे असे तिला वाटत होते. यातूनच डायरी लिहिण्याची तिला सवय लागली होती. पण आईच्या हातून मार खाल्ल्यानंतर त्या रोजनिशीचे रुपांतर कवितेत घडत गेले असे ती सांगते.